राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

By यदू जोशी | Updated: March 23, 2025 06:06 IST2025-03-23T06:05:42+5:302025-03-23T06:06:31+5:30

शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत

Has the closeness between the two factions of NCP increased again? The developments in the Rajya Sabha have fueled the discussion | राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले, पण अलीकडील काही घटना बघता दोहोंमध्ये दुरावा कमी होत असल्याचे चित्र आहे. भविष्यात दोघेही एकत्र येतील असे आताच दाव्याने सांगता येत नसले तरी त्यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे जाणवत आहे. दोन पवार वेगवेगळे झाल्यानंतर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी याचिका शरद पवार गटाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली होती. त्याचवेळी वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका अजित पवार गटाकडून करण्यात आली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई पुढे करू नये असे पत्र दोन्ही गटांनी दिले आणि त्या आधारे दोन्ही याचिका धनखड यांनी निकाली काढल्या.

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात ताणतणाव आजही कायम आहे. हे दोन्ही नेते एकमेकांकडे पाहणेदेखील टाळतात. शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली. त्यात ऊसशेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली. तिथे अन्य काहीजणही उपस्थित होते. या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही. या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नयेत.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

जयंत पाटील यांच्याशी चर्चा

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नियामक मंडळाच्या बैठकीसाठी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, वळसे पाटील हे नेते शनिवारी गेले होते.
त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. त्या निमित्ताने दोघे जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

एकमेकांवर टीका टाळण्याची भूमिका

  • विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन पक्षांचे बडे नेते, मंत्री एकमेकांसोबत बरेचदा जेवण करतात. हास्यविनोद सुरू असतात. छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यात छान संवाद असल्याचे स्पष्ट दिसते.
  • उद्धवसेनेचे आमदार शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडे काम घेऊन फारच अभावाने जातात, इकडे अजित पवारांच्या मंत्र्यांकडे शरद पवारांचे आमदार अगदी सहज जाऊन कामे करवून आणतात.
  • विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिंदेसेना-उद्धवसेनेचे आमदार एकमेकांवर अनेकदा धावून जातात, पण अजित पवार, शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये तसे कधीही घडत नाही. माध्यमांशी बोलताना सेनेच्या नेत्यांमध्ये जी कटूता दिसते, ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट कधीही एकत्र येऊ शकतात असे जाणवत राहते.

Web Title: Has the closeness between the two factions of NCP increased again? The developments in the Rajya Sabha have fueled the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.