'हा' नेता होता भाजपचा ओबीसी चेहरा; पण विधानसभेलाच झाला पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 13:46 IST2019-12-13T13:45:51+5:302019-12-13T13:46:51+5:30
मागील कार्यकाळात शिंदे यांनी बऱ्यापैकी मतदार संघावर पकड निर्माण केली होती. ते ओबीसी नेते म्हणून समोर येईल अशी अशा त्यांच्या समर्थकांना असताना त्यांनाही पराभव पत्करावा लागला.

'हा' नेता होता भाजपचा ओबीसी चेहरा; पण विधानसभेलाच झाला पराभूत
मुंबई - भारतीय जनता पक्षात ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप सध्या पक्षातील नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमधील ओबीसी नेत्यांची काही दिवसांपूर्वीच बैठकही झाली होती. यामध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि इतर नेत्यांचा समावेश होता. मात्र भाजपचा ओबीसी चेहरा असलेला नेता यापासून दूर होता.
भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाने माजीमंत्री राम शिंदे यांना ओबीसी नेता म्हणून पुढे करण्यासाठी प्रयत्न केले होते. अर्थात पक्षातील ओबीसी नेता म्हणवून घेणाऱ्यांना हा शह होता. त्यानुसार राम शिंदे यांना मंत्रीमंडळात बढती मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीतच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी त्यांना कर्जत-जामखेड मतदार संघातून पराभूत केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना ओबीसी नेता म्हणून पुढ करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले जलसंधारण खाते देखील त्यांना देण्यात आले होते. त्याचवेळी पंकजा आणि शिंदे यांच्यात वितुष्ट येणार हे दिसत होते. मात्र शिंदे यांनी वेळ निभावून नेली होती. हे सरताच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय तयार करून त्याची जबाबदारी देखील शिंदे यांच्यावर सोपविली होती. हा पंकजा यांना पुन्हा एक धक्का होता. पंकजा मुंडे यांच्या ओबीसी नेतृत्व या प्रतिमेला यामुळे धक्का बसणार होता.
दरम्यान मागील कार्यकाळात शिंदे यांनी बऱ्यापैकी मतदार संघावर पकड निर्माण केली होती. ते ओबीसी नेते म्हणून समोर येईल अशी अशा त्यांच्या समर्थकांना असताना त्यांनाही पराभव पत्करावा लागला. अर्थात ते भाजपकडून ओबीसी नेते म्हणून नावारुपास येण्यास सुरुवात झाली होती. मात्र पराभवामुळे त्यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.