विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:40 IST2025-08-09T12:39:49+5:302025-08-09T12:40:29+5:30
निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली.

विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा
मुंबई - काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, त्यानंतर दिल्लीत मला काही जण भेटायला आले. २ जण होते. महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो अशी त्यांनी ऑफर दिली. तेव्हा माझ्या मनात निवडणूक आयोग याबद्दल काही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो. या भेटीनंतर राहुल गांधी यांच्यासोबत मी त्या लोकांची भेट घालून दिली. त्या लोकांना जे म्हणायचे होते, ते त्यांनी राहुल गांधींसमोर म्हटले. परंतु राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण पडू नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांपर्यंत जाऊ, लोकांचा पाठिंबा मागू, जे निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरले असं त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, भाजपानेही नाही
तसेच निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आक्षेप हा मुख्यमंत्र्यांबद्दल नाही. आक्षेप निवडणूक आयोगावर घेतला आहे. मग भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री नेहमी पुढे येऊन का बोलतात हे समजत नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवंय, दुसऱ्यांकडून नाही. आमची माहिती चुकीची असेल तर निवडणूक आयोगाने देशाला सांगायला हवे. सत्य समोर यायला हवे. सोमवारी संसदेतील आमचे सगळे सहकारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यात कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील मतदारांबाबत भाष्य केले, जिथे निवडणूक नाही. लोकांसमोर जे आरोप ठेवले आहेत त्यावर गृहमंत्र्यांची उत्तर देण्याची जबाबदारी होती. मात्र आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळवण्याचं काम भाजपाकडून केले जात आहे. मागील १५ दिवसांपासून मतदार याद्यांच्या घोळाबाबत संसदेत गदारोळ सुरू आहे असं पवारांनी म्हटलं.
'त्या' दोघांचा सरकारने शोध घ्यावा - भाजपा
शरद पवारांचा दावा अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहेत. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बालबोध दावे करणारे खरेच आश्चर्यकारक आहेत. जर आपल्याकडे अशी २ माणसे आली होती तर तुम्हाला निवडणुकीत काही गडबड करायची होती का हा उद्देश होता का, त्या माणसांबाबत तातडीने पोलीस किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रार का केली नाहीत. उलटपक्षी या लोकांना घेऊन तुम्ही राहुल गांधींकडे गेला. म्हणजेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून तुम्हाला अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का, त्यामुळे आता सगळे झालंय, राहुल गांधी, काँग्रेस, शरद पवार हे सगळे विचलित झालेत. हतबलतेतून या गोष्टी पुढे येत आहेत. लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला तेव्हा तुम्हीच याच प्रकाराचा आधार घेतला पण विधानसभेला शक्य झाले नाही असं म्हणायचे का..हे कुणाला पटणारे नाही. जेव्हा तुमच्याकडे हा प्रकार आला तेव्हाच तक्रार केली पाहिजे होती. या २ व्यक्ती कोण याचा तपास झाला पाहिजे किंवा सरकारने यात सुमोटा घेऊन त्या २ व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी करत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा फेटाळला आहे.