आजीच्या हातचा फराळ परदेशातला नातू चाखणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:37 IST2025-10-10T10:37:26+5:302025-10-10T10:37:47+5:30
परदेशातच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांनाही फराळ पार्सल पाठविता येईल, अशी माहिती देण्यात आली.

आजीच्या हातचा फराळ परदेशातला नातू चाखणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीनिमित्त भारतीय टपाल विभागाने नागरिकांसाठी एक खास भेट दिली आहे. नागरिक आता परदेशातील आप्तस्वकीयांना ‘आजीच्या हातचा फराळ’ पाठवू शकतील. टपाल विभागाने अनेक देशांपर्यंत ‘फराळ पार्सल सेवा’ सुरू केली असून, या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा आणि फराळ पोहोचविता येणार आहे.
कोणत्या सुविधा?
पार्सलसाठी विशेष फूड ग्रेड बॉक्सेस आणि सुरक्षित पॅकिंगची सोय पोस्ट ऑफिसमध्येच करण्यात आली आहे.
परदेशात ‘फराळ पार्सल’
फराळ पार्सल या योजनेंतर्गत भारतातील कोणत्याही टपाल कार्यालयातून पार्सल बुक करता येणार आहे.
यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई, अमेरिका यांसारख्या प्रमुख देशांपर्यंत सेवा उपलब्ध आहे.
कुठे, कसे करायचे बुकिंग?
पार्सल सेवा जवळच्या प्रमुख टपाल कार्यालयात उपलब्ध असून, ग्राहकाला फक्त बुकिंग आणि पत्ता पुरावा दाखवावा लागेल. नोंदणी, पॅकेजिंग आणि शुल्क एकाच ठिकाणी करता येणार आहे.
घरगुती फराळाची चव चाखा
घरी बनविलेला चिवडा, लाडू, करंजी, चकली, शेव यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद परदेशात असलेले आप्त आता घेऊ शकणार आहेत
मागील वर्षी हा प्रयोग केला होता. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात ३५ हजार जणांनी याचा लाभ घेतला. त्यामुळे टपाल खात्याला पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यंदाही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. या सेवेद्वारे दिवाळीचा आनंद सीमांच्या पलीकडे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अमिताभ सिंह, मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल