पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 06:08 IST2025-10-08T06:08:13+5:302025-10-08T06:08:32+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार राज्य सरकारचा निर्णय : बाधित पिकांसाठी तब्बल १८ हजार कोटींची तरतूद, ६५ मिमी पावसाची अट रद्द, निकषापेक्षा जास्त मदत

पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांना ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदतीचे मेगापॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले. शेतीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर करताना संकटग्रस्तांसाठी आजवरचे हे सर्वांत मोठे पॅकेज असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दत्ता भरणे, मकरंद पाटील, अतुल सावे, प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.
टंचाई काळातील सवलती लागू
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र, दुष्काळात ज्या उपाययोजना लागू केल्या जातात त्या लागू केल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी वीज बिल वसुलीत सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामात सुधारणा यांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
टंचाईचा काळ समजून सर्व उपाययोजना राबवणार
या आपत्तीने शेतकऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण आला आहे. त्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी आम्ही ऐतिहासिक पॅकेज देत आहे. टंचाईचा काळ समजून आम्ही सर्व उपाययोजना राबवणार आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अनेक जण मदतीची मागणी करत होते. त्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि पंजाबचे उदाहरण दिले जात होते. मात्र, त्याहीपेक्षा मोठे पॅकेज आम्ही दिले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
कुठलाही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी पॅकेजमध्ये घेतली आहे. काही गोष्टींचा अंतर्भाव करायचा राहून गेला असल्यास त्याचाही समावेश करण्याची तयारी आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
या पॅकेजअंतर्गत बाधित पिकांसाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्यात आली असून, सरसकट नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, त्याच्या पुनर्निमाणासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. पीक विमा काढलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची योग्य रक्कम लवकर मिळावी, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. नुकसानीपोटी पीकविम्याचे सुमारे हेक्टरी १७ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील.मच्छीमारांच्या बोटींचे नुकसान झाले.
या सर्वांसाठी १०० कोटींची तरतूद.
अशी मिळणार मदत
- मृतांच्या कुटुंबीयांना : ४ लाख प्रत्येकी
- जखमी व्यक्तींना : ७४ हजार ते २.५ लाख रुपये मदत देणार.
- घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान : ५ हजार रुपये प्रति कुटुंब दिले जाणार.
- दुकानदार, टपरीधारक : ५० हजार रुपये मदतीची तरतूद.
- पडझड झालेल्या घरांना : १ लाख २० हजार रुपयांची तरतूद.
- डोंगरी भागात पडझड झालेल्या घरांना : १ लाख ३० हजार रुपयांची तरतूद
- अंशतः पडझड घरे : ६ हजार ५०० रुपये
- झोपड्यांना : ८ हजार रुपये
- जनावरांचे गोठे : ३ हजार रुपये
- दुधाळ जनावरे : ३७ हजार ५०० रुपये
- ओढकाम करणारी जनावरे : ३२ हजार
- कुक्कुटपालन : १०० रुपये
- खरडून गेलेल्या जमिनीसाठी : ४७ हजार रुपये प्रति हेक्टर रोख मदत आणि ३ लाख रुपयांपर्यंत मनरेगामार्फत मदत
- बाधित विहिरींसाठी : ३० हजार रुपये