वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:07 PM2020-03-24T18:07:19+5:302020-03-24T18:09:45+5:30

पहिल्यांदाच पडला शांततेत कार्यक्रम

Government tribute to chatrapati sambhaji maharaj at wadhu budruk and tulapur | वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत पुजाभिषेक : पहिल्यांदाच पडला शांततेत कार्यक्रम

कोरेगाव भिमा : ‘हरहर महादेव... संभाजी महाराज की जय,’ अशा गगनभेदी जयघोषात छत्रपती शंभूराजां बलिदान स्मरण दिन सोहळा पार पडला. देशासह राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या सावटामुळे छत्रपती शंभूराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढु बुद्रुक आणि तुळापुर येथे दरवर्षी होणाऱ्या बलिदान स्मरण दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. मंगळवारी छत्रपती संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांच्या हस्ते शासकीय पुजा करुन शंभुराजांच्या समाधीपुढे शासकीय मानवंदनाही देण्यात आली.आणि 
   स्वराजाचे दुसरे छत्रपती शंभूराजांच्या बलिदानस्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लाखो शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी श्रीगोंदा, नाशिक, पुण्यासह अनेक भागातुन शंभूज्योत, पुरंदर ते वढु पालखी सोहळा, हेडगेवार ज्योत आणत असतात. शिरुर-हवेली प्रासादिक दिंडी व बंडातात्या कराडकर यांच्या माध्यमातुनही अनेक दिंड्या शंभूराजांच्या समाधीस्थळी येत असतात. त्याचप्रमाणे विविध गावातुन येणारे शंभूभक्त बलिदान दिनाच्या अगोदर महिनाभर बलिदान मास पाळत असतात. बलिदान मास पाळणारे शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीला मुकपदयात्रेच्या माध्यमातुन ग्रामप्रदक्षिणा घालत असतात. यावेळीही पाच ते सहा हजार शंभुभक्त उपस्थित असतात.
  शंभूराजांच्या समाधीवर हेलीकॅप्टरने पुष्पवृष्ठी व गेल्या काही वर्षांपासून शासकीय मानंवदना होत असल्याने ते पाहण्यासाठी लाखो शंभूभक्त उपस्थित असतात. मानवंदनेसाठी सिनेसृष्टीसह सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवरही येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, कोरोना विषाणुच्या संसर्गाचा धोका असल्याने पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करावेत, आणि स्थानिक पातळीवर फक्त धार्मिक पुजाविधी करावेत आणि शंभू भक्तांनी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार वढु बुद्रुक येथे होणारे बलिदान स्मरण दिनाचे नियोजित कार्यक्रम  रद्द करून वढुतील समाधीस्थळाचे ३१ मार्च पर्यंत दर्शनही बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करीत येथील प्रवेशद्वारेही बंद केली आहेत.


 मंगळवारी छत्रपती श्री संभाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांच्याहस्ते शंभूछत्रपतींच्या समाधीवर जलाभिषेक करुन शासकीय पुजा केली. यावेळी उपसरपंच रमाकांत शिवले, संतोष शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे आदी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त शंभूराजांच्या पुणार्कृती पुतळा व समाधीस्थळावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधिक्षक संदिप पाटिल यांच्या आदेशाने शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीपुढे ग्रामीण पोलीसांनी शासकीय मानवंदना दिली.
.............
 तुळापुर येथे संभाजी महाराजांना अभिवादन
३३१ व्या पुण्यतिथी सोहळा : मोजक्याज कार्यकर्त्यात अभिवादन 
 लोणीकंद : ‘हरहर महादेव... संभाजी महाराज की जय,’ अशा गगनभेदी घोषणा देत मोजक्याच  उपस्थितांमध्ये तसेच विधीवत पुजा आभिषेक करुन मंगळवारी श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे  छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  
  मंगळवारी सकाळी संगमेश्वर अभिषेक छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश यांच्या समाधी पुजा अभिषेकाप्रसंगी सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत, माजी सरपंच गणेश पुजारी, अमोल शिवले, संतोष शिवले आणि ज्ञानेश्वर शिवले आणि मोजक्याच कार्यकर्त्यांनी विधीवत अभिषेक पुजा केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या.
    राज्यात करोनो विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वस्तरावर प्रयत्न करत आहे. या पाश्वभुमिवर ग्रामस्थानी व तमाम शंभूभक्तानी सर्वतोपरी दक्षता घेतली होती. गर्दी जमविण्यात आली नाही. कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नव्हते. अत्यंत साधा पध्दतीने  उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षात प्रथमच शांतपणे कार्यक्रम झाला. संभाजी महाराज भक्ताच्या वतिने बलीदान मास पाळण्यात येत आहे.  छ. संभाजी महाराज याचे जे हाल झाले त्याचे प्रतिक म्हणून महिन्यात उपवास धरण्यात येत आहे. अनवानी रहाणे घोडधोड खायचे नाही असे व्रत  पाळण्यात येत आहे. या असंख्य कार्यकर्त्यांनी घरीच धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी केली.  यावेळी विलास उंद्रे, संगिता गायकवाड , संग्राम गायकवाड आदी उपस्थित होते.
    


 

Web Title: Government tribute to chatrapati sambhaji maharaj at wadhu budruk and tulapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.