नक्षलवादाच्या नावाखालची धरपकड सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 22:17 IST2018-08-30T22:14:02+5:302018-08-30T22:17:32+5:30
देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

नक्षलवादाच्या नावाखालची धरपकड सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी
पुणे : देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी केला. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात हे कशाचं लक्षण आहे, या उलट सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणाऱ्या विचारवंतांची धरपकड केली जातेय याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आजपासून कोल्हापूर येथून काँग्रेस सुरु करणाऱ्या जनसंघर्ष यात्रेची माहिती त्यांनी दिली.ते म्हणाले की,राज्यात पहिल्यादा पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा काढण्यात येणार असून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. आठ दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागात यात्रा जाईल आणि सरकारची पोलखोल केली जाईल.पश्चिम महाराष्ट्रातील या यात्रेचा समारोप 8 सप्टेंबरला पुण्यात होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे संघर्ष यात्रा काढली जाणार असून तीन महिन्यांच्या कालावधीत ही जनसंघर्ष यात्रा होणार आहे. दलित आदिवासी अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत, अशा या सरकारच्या विरोधात जनमत जाग करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.