गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 08:59 IST2025-09-19T08:55:56+5:302025-09-19T08:59:02+5:30
Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
"प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना अशा प्रकारची विधाने करू नये. अशा प्रकारची वक्तव्ये ही वेदना देणारी असतात", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले. 'वादग्रस्त विधानांसंदर्भात महायुतीचे धोरण ठरलेले आहे. भाजपच्या संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते यावर बोलतील", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटलांवर टीका करताना पातळी सोडली. राजाराम पाटील, जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत पडळकरांनी टीका केली आहे.
पडळकरांचं वादग्रस्त विधान काय?
गोपीचंद पडळकरांचा एका कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. "अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?", असे विधान पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केले.
अजित पवार गोपीचंद पडळकरांच्या विधानावर काय बोलले?
नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण, मी याच विचाराचा आहे की, कोणी कोणत्याही राजकीय विचारांचा असो... आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे."
"महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना अशा प्रकारची वक्तव्ये करू नये. अशी वक्तव्ये ही वेदना देणारी असतात", असे अजित पवारांनी सुनावले.
"पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीस बोलतील"
अजित पवार म्हणाले, "वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुतीमधील तीनही पक्षाती ज्या लोकांनी विधान केलं आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी त्याची दखल घ्यावी आणि भूमिका मांडावी, असे आमचे धोरण ठरले आहे"
"शिवसेनेमधून काही वादग्रस्त विधान केले गेले, तर एकनाथ शिंदे बोलतील. माझ्या पक्षातून काही विधान आले तर त्याची जबाबदारी माझी आहे. भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.