आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:09 IST2025-07-19T06:08:48+5:302025-07-19T06:09:07+5:30
पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानभवन राडा प्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवत हृषीकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले आणि नितीन देशमुख यांना मध्यरात्री अटक केली. देशमुखांच्या अटकेनंतर संतप्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोरच स्वत:ला झोकून दिले. त्यांना गाडीसमोरून फरफटत बाजूला करण्याची वेळ पोलिसांवर आली. सरकारी कामात अडथळा प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधातही शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेला केला विरोध, कार्यकर्तेही आक्रमक
मध्यरात्री पोलिस देशमुख यांना विधानभवनातून ताब्यात घेण्यासाठी आले असताना आव्हाड यांनी प्रवेशद्वारासमोरच पोलिसांचे वाहन अडवले. आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर झोकून देत अटकेला विरोध केला. यावेळी त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. कारवाईला विरोध करीत घोषणाबाजी सुरू झाली. या हायव्होल्टेज ड्रामानंतर पोलिसांवर अखेर आव्हाडांना फरफटत बाजूला केले. त्यानंतर पोलिस देशमुख यांना घेऊन मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आले. काही वेळातच आव्हाडांसह रोहित पवार आणि इतर पक्ष कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर घेराव घातला.
गुन्हेगारीचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात
टकले, देशमुख यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिवमल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष टकलेविरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याविरुद्ध सांगलीत झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशमुख आणि टकले यांनी ६ ते ७ अनोळखी जणांसह विधानभवनात बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून हाणामारी केली. तसेच, कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवरही बलप्रयोग केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आमदार खुणावतात अन् गुंड देशमुखला मारतात : आव्हाड
जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यात संबंधित आमदाराबरोबर उभ्या असलेल्या गुंडांना आमदार खुणवतो. त्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात आणि नितीन देशमुखला मारतात. आम्हाला अध्यक्ष सांगतात, आम्ही सगळ्यांना सोडून देतो, असे आमदार आव्हाड म्हणाले.
त्यानंतर अचानक मला फोन येतो, नितीन देशमुखला अटक केली. मी यासंदर्भात पोलिसांना विचारले की, अटक कशासाठी करण्यात आली आहे ? तर पोलिस सांगतात की, आम्हाला फक्त पोलिस स्टेशनला घेऊन जा, असे आदेश होते. त्यामुळे मी लोकशाही पद्धतीने पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन केले, असे आव्हाड यांनी सांगितले.