Goodbye of Khadse to BJP join NCP tomorrow | खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर

खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळे खापर फोडले दुसरीकडे नवरात्रौत्सव काळातील या राजकीय सीमोल्लंघनातून खडसे यांचे मंत्रिपदावर पुनर्वसन होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.


मुक्ताईनगर (जि. जळगाव) : गेले अनेक दिवस राजकीय विजनवासात असलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळे खापर फोडले असून फडणवीस यांनीच आपणास पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे नवरात्रौत्सव काळातील या राजकीय सीमोल्लंघनातून खडसे यांचे मंत्रिपदावर पुनर्वसन होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. आपल्यासोबत सध्या एकही खासदार अथवा आमदार प्रवेश करणार नाही. खासदार रक्षा खडसे भाजपतच राहतील. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकार आपल्या सोबत असतील, असे खडसेंनी सांगितले.

अनेक जण संपर्कात -
खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक आमदार-खासदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. पण सध्याच्या काळात पोटनिवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे फक्त खडसे यांचाच शुक्रवारी पक्षात प्रवेश होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांनी पक्ष सोडण्यास मला भाग पाडले -
माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोपही खडसे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला -
खडसे हे स्पष्टवक्ते व लढवय्या आहेत. महाविकास आघाडीत त्यांचे स्वागत. परंतु यशाची शिखरे सर करत असताना आपला पाया का ठिसूळ होतोय? पायाखालची जमीन का सरकतेय? मुळे का निसटत आहेत? याचा भाजपने विचार करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

पंकजा मुंडेंना सेनेची ऑफर! -
भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच आहे, अशी आॅफर शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. याबाबत पंकजा यांना विचारले असता त्या फक्त हसल्या!
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Goodbye of Khadse to BJP join NCP tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.