पोलीस मुख्यालयात गोकुळ

By Admin | Updated: June 29, 2014 00:35 IST2014-06-29T00:35:34+5:302014-06-29T00:35:34+5:30

ऐनवेळी कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, कोणती स्थिती निर्माण होईल आणि कुणाला कधी तिकडे बंदोबस्तासाठी पळावे लागेल, याचा नेम नसल्यामुळे पोलीस मुख्यालयातील वातावरण नेहमीच अस्वस्थ असते.

Gokul at the police headquarters | पोलीस मुख्यालयात गोकुळ

पोलीस मुख्यालयात गोकुळ

चिमुकल्यांसाठी पाळणाघर : दिल्लीच्या धर्तीवर नागपूर पोलिसांचा उपक्रम
नरेश डोंगरे - नागपूर
ऐनवेळी कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, कोणती स्थिती निर्माण होईल आणि कुणाला कधी तिकडे बंदोबस्तासाठी पळावे लागेल, याचा नेम नसल्यामुळे पोलीस मुख्यालयातील वातावरण नेहमीच अस्वस्थ असते. रुक्ष आणि रटाळ वातावरणामुळेच मुख्यालयात बदली म्हणजे शिक्षा असेही पोलीस दलात मानले जाते. मात्र, आता याच मुख्यालय परिसरात ‘गोकुळ’ अस्तित्वात आल्यामुळे मुख्यालयाचे स्वरूप ‘गोंडस’ होणार आहे.
येथे चिमुकल्यांचा चिवचिवाट राहील. मुख्यालय परिसरात महिला पोलिसांच्या चिमुकल्यांसाठी पाळणाघर निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे महिला पोलिसांना ड्युटीवर असताना कतृत्त्वासोबत मातृत्त्वही जपता येणार आहे. पोलीस दलात ३० टक्के महिला कर्मचारी असाव्या, असा विचार गृहमंत्रालयातून पुढे आला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. सध्या पोलीस दलात सरासरी १५ टक्के महिला कर्मचारी आहेत. नागपुरात सात हजार पोलिसांमध्ये ११५० महिला आहेत. अर्थात नागपूर पोलिसात महिलांची टक्केवारी १६ टक्के असल्याचे अधिकारी सांगतात. महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेनंतरच्या ठराविक मुदतीत कर्तव्यावर हजर व्हावे लागते. बरेचदा कर्तव्यावर असताना घरी जाण्यास वेळ होतो. हे ध्यानात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्याची कल्पना चार महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्याकडे आली. त्यांनी लगेच तिच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस मुख्यालयाच्या प्रशस्त परिसरात दिल्लीच्या धर्तीवर पॉश ‘पाळणाघर’ निर्माण झाले. परिसरात हिरवळ निर्माण करण्यात आली.
झुले, घसरणपट्टी, बंगईही लागली. मिकी माऊसपासून वेगवेगळी खेळणीही आली. या पाळणाघराचे काम पूर्ण झाले आहे. बुधवारी पाळणाघर लोकार्पणाचा (ऐनवेळी काही समस्या निर्माण झाली नाही तर !) छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचेही ठरले आहे.

Web Title: Gokul at the police headquarters