१० हजार कोटींचे सॉफ्टलोन साखर उद्योगाला तातडीने द्या, भाजपच्या शिष्टमंडळांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:21 IST2020-07-18T02:19:00+5:302020-07-18T07:21:42+5:30
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी सहभागी झाले होते.

१० हजार कोटींचे सॉफ्टलोन साखर उद्योगाला तातडीने द्या, भाजपच्या शिष्टमंडळांची मागणी
कोल्हापूर : सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर संबंधित मंत्रिगट समूहासमोर हे प्रश्न मांडून मदत केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी सहभागी झाले होते.
बैठकीतील चर्चेची माहिती धनंजय महाडिक यांनी ‘लोकमत’ला दिली. साखर उद्योग गतवर्षी दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि यावर्षी कोरोनाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे एफआरपीपासून कामगारांचे पगार देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत.
त्यासाठी केंद्र शासनाने या उद्योगाला भरीव मदत करण्याची गरज आहे, हे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. शहा यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रामविलास पासवान यांनाही देणार आहोत, असेही महाडिक यांनी सांगितले.
खरेदी दराबाबत
साखरेचा क्विंटलचा खरेदी दर ३१०० वरून ३३०० रुपये करण्याची मंत्रिगटाने शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी एक आॅक्टोबरऐवजी एक आॅगस्टपासूनच करावी, अशीही मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील कोरोना स्थितीसंदर्भातील केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली. या भेटीत कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता. राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. -देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री