'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 23:15 IST2025-09-22T23:14:40+5:302025-09-22T23:15:51+5:30
धनंजय मुंडे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
Ajit Pawar On Dhananjay Munde Request: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी आरोग्यविषयक समस्यांचे कारण दिलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीवरुन राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मीक कराडच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. धनंजय मुंडे यांनी कर्जतमधील एका कार्यक्रमात बोलताना यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच मोठी मागणी केली. मला रिकामं ठेवू नका. एखादी जबाबदारी द्या, अशी विनंती धनंजय मुंडेंनी केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मागणीवर मोजक्या शब्दात सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्या विनंतीचा मान केला जाईल, त्यांच्या सूचनांचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसणार की त्यांच्याकडे अन्य कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
"माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो," असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंना देण्यासाठी माझ्याकडे एक काम आहे - छगन भुजबळ
"धनंजय मुंडे यांच्या मागणीचा पक्ष जरूर विचार करेल. तोवर मी एवढंच सांगेन की आपल्याकडे एक काम आहे. बाकीच्या जबाबदाऱ्यांचं अजित पवार पाहतील. पण, आपल्याकडे ओबीसी आरक्षणाचं काम आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे ओबीसी आरक्षणाचं काम करत होते, त्यापैकी बरंच काम बाकी आहे. धनंजय मुंडे हे या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सहभागी झाले तर बरं होईल. यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न देखील पूर्ण होईल," असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.