साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 05:48 IST2025-04-21T05:48:15+5:302025-04-21T05:48:51+5:30

लग्नाआधीच जीव दिलेल्या मुलीच्या आईचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना भावनिक पत्र

Girl in Dharashiv commits suicide due to harassment, mother of victim writes letter to Deputy CM Eknath Shinde | साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या

साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या

बीड - येथील एका मुलीची काही मुलांनी छेड काढली, ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केले, जबरदस्ती व्हिडीओ व फोटो काढले. हा अत्याचार असह्य झाल्याने तिने धाराशिव येथे मामाच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला घेतला असल्याचेही म्हटले आहे.

कोयना विटकर यांच्या पत्रानुसार, बीडच्या केएसके महाविद्यालयात साक्षी संतोष कांबळे (२०) कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती. हवाई सुंदरी होण्याचे तिचे स्वप्न होते. काही मुलांनी ब्लॅकमेल करून तिच्या सोबत अनैतिक कृत्य केले, याला कंटाळून धाराशिव येथे मामाच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी धाराशिव सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलिस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी जबाब घेतला नाही, उलट अपमानित केले. यात आरोपीची बहीणही आरोपी आहे. मात्र, ती पोलिस दलात असल्याने पोलिस मदत करत नसल्याचा आरोप विटकर यांनी केला आहे.

२० एप्रिलला होते लग्न
साक्षीने १४ मार्च रोजी धाराशिव येथे आत्महत्या केली. तिचा विवाह पुणे येथील एका मुलासह ठरविण्यात आला होता. तिच्या विवाहाची तारीख २० एप्रिल होती. अभिषेक कदम, शीतल कदम यांच्या धमक्यांमुळे तिने आत्महत्या केल्याचे कोयना विटकर यांनी सांगितले.

महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीही केली छेडखानीला कंटाळून आत्महत्या
ज्या आरोपी मुलाने छेडखानी केली, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केले त्याच्या मोबाइलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केले नाही. याच दरम्यान, केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनी देखील छेडखानीला कंटाळून आत्महत्या केली. आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्याने कोणताही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाहीत, या गुंडांची दहशत पाहता आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न पडल्याचे कोयना विटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

या जगात आता ती परत येणार नाही; पण त्या नराधमांना कसे सोडणार?
साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे. तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपविले. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहीत आहे मात्र क्रूर नराधमांना शिक्षा होणे अपेक्षित आहे, असेही विटकर यांनी पत्रात म्हटले आहे

Web Title: Girl in Dharashiv commits suicide due to harassment, mother of victim writes letter to Deputy CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.