BJP Girish Mahajan News: ठाकरे गट अजून संपायचा बाकी राहिला आहे का, तुम्ही ज्या ब्रँडचा विषय करत आहात, शिवसेनेचा विषय करत आहात, ती शिवसेना आणि तो ब्रँड आता तुमचा राहिलेलाच नाही. ज्यावेळेस तुम्ही काँग्रेससोबत गेलात, तेव्हाच तुमचा ब्रँड संपला. २०१९ ला तुम्ही आमच्यासोबत राहिलात, निवडून आलात, ५५ लोक तुमचे आले. आमचेही १०६-१०७ लोक आले होते. एवढे लोक निवडून येऊनही तुम्ही आम्हाला सोडून तिकडे गेलात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, त्याचवेळेस तुमचा ब्रँड संपला, अशी टीका भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना जमीनदोस्त होत नाही, कारण शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, म्हणून तुम्ही संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमची मूळे जमिनीच्या खाली गेलेली आहेत. ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलेलो आहोत. ठाकरे ब्रँड हा आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर जनतेशी प्रामाणिक आहोत. ठाकरे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. आपल्या वेदनेला निर्भीड वाचा फोडणारे आहेत, हे जनतेला माहित आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्याबरोबर आहे. ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मितेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच काम केले . आमची ही ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमची ओळख पुसू इच्छिणारेच पुसले गेले. ठाकरे म्हणजे नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे मराठी माणसाची, महाराष्ट्राची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे, असे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर टीका केली.
मार्केटमध्ये असे ब्रँड येतात आणि जातात
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाचा विषय वेगळा होता. त्यांचे विचार वेगळे होते. त्यांची आयडिओलॉजी वेगळी होती. तुम्ही साध्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही त्यातून काही शिकायला हवे. आपला ब्रँड राहिला कुठे, याचा विचार करायला हवा. मार्केटमध्ये असे ब्रँड येतात आणि जातात. काही पडद्याआड जातात, त्यातलाच हा प्रकार आहे, या शब्दांत गिरीश महाजन यांनी निशाणा लगावला. तसेच उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यावर मराठीत बोलतात का, दिल्लीत गेल्यावर फक्त मराठीतच बोलणारे, असे कसे चालेल. आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहेच, पण भारतासारख्या देशात दुसऱ्या भाषेचा द्वेष करून चालणार नाही. आमच्या भाषेत बोलण्याचा आणि शिकण्याचा अधिकार आहे. परंतु, दुसऱ्या भाषेचा द्वेष योग्य नाही. फक्त निवडणुका आल्या की, हे विषय का निघतात, हे मला समजत नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, मी गेली ३५ वर्षे आमदार आहे. निवडणुका आल्या की, मुंबईला तोडणार, मुंबईला तोडून गुजरातला जोडले जाणारे, हा विषय पक्का येतो. हे यांचे नेहमीचेच आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायचे आहे, वेगळे करायचे आहे, असे बोलतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, कुणाच्या बापाची हिंमत नाही. बापाच्या बापाचीही नाही. एवढे सांगूनही कोणाच्या लक्षात येत नसेल आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मराठी मतांवर डोळा ठेवून मुद्दाम अशा प्रकारची विधाने करत असतात.