ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 22:26 IST2025-10-13T22:24:28+5:302025-10-13T22:26:18+5:30
मीरारोड- घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुख दरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या मजबुतीकरणसाठी ११ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजल्या पासून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर पूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली.

ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
मीरारोड- घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुख दरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या मजबुतीकरणसाठी ११ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजल्या पासून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर पूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेश बंदी काटेकोर राबवण्यात पोलीस अपयशी ठरल्याने घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांनी मोठी कोंडी झाली. हि कोंडी राष्ट्रीय महामार्ग वर देखील होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
घोडबंदर मार्गावरील काजूपाडा पासून ठाण्या कडे जाणारी चढण रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केले आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना पूर्णपणे मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाने बंदी केली होती. त्यासाठी पोलिसांनी अवजड वाहनांना पर्यायी मार्ग जाहीर करून ठिकठिकाणी बंदी राबवण्यासाठी पोलीस नेमले.
मात्र प्रत्यक्षात अवजड वाहनांना रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले. पोलिसांचे नियोजन चुकले व अवजड वाहने नेहमी प्रमाणेच बेधडक घोडबंदर मार्गवर आली. त्यामुळे घोडबंदर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या रांगा राष्ट्रीय महामार्गावर काशिमीरा पर्यंत तर वसईच्या दिशेने सुवि पॅलेस पर्यंत लागत आहेत.
ह्या वाहन कोंडीत लहान वाहने, परिवहन बस देखील अडकून पडल्याने लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नेहमीच्या तासा भराच्या प्रवासाला चार - चार तास लागत असल्या बद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिके कडून ३ ठिकाणी काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न
१) काजूपाडा खिंडीच्या चढणीवर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्ता मजबुतीकरणाचे डीबीएम आणि मास्टिक काम पूर्ण झाले आहे. सुमारे ४५० मीटर लांबीची मार्गिका मजबूत केली असून मास्टिक पूर्णपणे सुकावे म्हणून किमान ६ ते ४८ तास लागतात.
२) काजूपाडा गाव - सिग्नल या ठिकाणी ठाण्या कडे जाणारी मार्गिका खूपच खराब झाली असून सुमारे सव्वा दोनशे मीटर लांबीच्या रस्त्याचे डीबीएम पूर्ण होऊन मास्टिक काम सुरु आहे.
३) चेणे पुलावर घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही मार्गिकांवर मजबुतीकरण काम आहे. मीरारोड दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ठाणे दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्याची घाई आहे.