'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांनी विधानसभेत महायुती सरकारवर डागले बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:10 IST2025-03-11T19:06:37+5:302025-03-11T19:10:09+5:30
अर्थसंकल्पावरील चर्चेत जयंत पाटील सहभागी झाले. यावेळी त्यांनी एक कविता वाचून दाखवत महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले.

'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांनी विधानसभेत महायुती सरकारवर डागले बाण
Jayant Patil News: 'महाराष्ट्र आता थांबणार नाही', या अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलेल्या ओळीचाच आधार घेत जयंत पाटलांनी सरकारला चिमटे काढले. राज्याची आर्थिक परिस्थिती, वाढलेली गुन्हेगारी, लोकांसाठी आणलेल्या योजनांसाठी तरतूद न केल्याचा मुद्दा अधोरेखित जयंत पाटलांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारला सुनावले. जयंत पाटलांनी विधानसभेत एक कविता वाचून दाखवत अर्थसंकल्पावर भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अजित पवारांनी कविता दिली. महाराष्ट्र आता थांबवणार नाही, अशी कविता आहे. पण, मीही विचार करायला लागलो की कविता काही सुचतेय का बघावं. शंभूराजे, मी काही कविच्या मार्गावरचा नाहीये. पण, तरी चार ओळी सुचल्या आहेत", असे म्हणत जयंत पाटलांनी कविता वाचून दाखवली.
जयंत पाटलांनी विधानसभेत म्हटलेली कविता
सज्जन आता जगणार नाही
दुर्जन आता मरणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
गुन्हेगारी थांबणार नाही
रक्तपात रोखणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही
जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
आश्वासने पूर्ण करणार नाही
विकासाची वाट धरणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
रोजगार देणार नाही
शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
अजितदादांनी तुकोबांना दूर केलंय
कविता वाचल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, "मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे", असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.