“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:37 IST2023-12-13T17:37:08+5:302023-12-13T17:37:17+5:30
Gautami Patil Reaction On Maratha Reservation: राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर गौतमी पाटीलने सूचक उत्तर दिले.

“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत
Gautami Patil Reaction On Maratha Reservation:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसीमधून आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असून, याला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आहे. यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ आमनेसामने आले आहेत. यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मलाही कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली आहे. गौतमी पाटीलने केलेले विधान चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
गौतमी पाटील हिची अद्यापही राज्यभरात क्रेझ कायम आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांत राडेही होत असतात. मात्र, निमित्त कोणतेही असो, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी डिमांड असल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी गौतमी पाटीलला प्रश्न विचारला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे, आज अनेकांना आरक्षण हवे आहे. तर ते मिळाले पाहिजे. मला देखील आरक्षण हवे आहे. मलाही कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, असे सांगत, कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवे. सध्या सगळे नीट सुरू आहे, असे गौतमी पाटीलने म्हटले आहे. गौतमी पाटील राजकारणात एन्ट्री करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, मी अजिबात राजकारणात जाणार नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले.
दरम्यान, गौतमी पाटीलसोबतच आता हिंदवी पाटीलची लोकप्रियता वाढत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचे चांगले होवो. आमच्यातून कोण फुटून गेले तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचे चांगले होऊ दे, असे आम्ही म्हणतो, असे गौतमी पाटीलने सांगितले.