MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:28 IST2025-12-26T16:16:58+5:302025-12-26T16:28:38+5:30
एका आघाडीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर एका आघाडीच्या वृत्तपत्रात झळकलेल्या जाहिरातीवरून चांगलाच वाद पेटला आहे.. या जाहिरातीत गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवण्यात आले, असा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी भाजपवर बोचरी टीका केली. भाजपला हिंदुत्वाशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांनी हिंदूंच्या आराध्य दैवताचा अपमान केला आहे," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
यशवंत किल्लेदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, एका आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये केंद्र सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजचे कपडे परिधान केलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे, ही कृती म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आणि देवाचा घोर अपमान असल्याचे किल्लेदार यांनी म्हटले आहे.
गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते.… pic.twitter.com/uM1gtNwDpH
— Yashwant Killedar (@YKilledar) December 26, 2025
"भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला"- किल्लेदार
ते पुढे म्हणाले की, "एककीकडे भाजपचे कार्यकर्ते ख्रिसमस साजरा करणाऱ्यांना विरोध करतात, त्यांना मारहाण करतात. तर दुसरीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चर्चमध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करतात. हा सर्व सत्तेसाठी चाललेला खेळ आहे. गणपती बाप्पाचा असा अपमान करण्याचा नालायकपणा करून भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा आता फाटला आहे."
सरकारने माफी मागावी; मनसेची मागणी
या जाहिरातीमुळे सर्वसामान्य हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून, केंद्र सरकारने या कृत्याबद्दल त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा...सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी… pic.twitter.com/H6kem1RxVj
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) December 26, 2025
मनसेपाठोपाठ काँग्रेसही आक्रमक!
मनसेपाठोपाठ काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही या जाहिरावरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, "हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा...सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य? श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह आहे."