‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:23 IST2025-07-14T10:23:34+5:302025-07-14T10:23:51+5:30
Ladki Bahin Yojana and NCP Ajit Pawar: महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्रीच या योजनेबद्दल तक्रार करत असल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीला सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजने’बाबत आता मंत्रीच तक्रार करू लागले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांना निधी मिळायला उशीर होतो, असे वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तर या योजनेमुळे इतर योजनांना पैसे येण्यास उशीर होत असल्याचे कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून यापूर्वी निधी वर्ग करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. आता महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्रीच या योजनेबद्दल तक्रार करत असल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
मंत्री भरणे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, मी इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांना जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज लाडक्या बहिणींमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय. थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू पूर्ववत यायला लागली आहे.
‘प्राधान्य कशाला हे सरकारने ठरवायचे’
भरणे यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता भुजबळ म्हणाले की, यात लपवण्यासारखे काही नाही, स्वाभाविक आहे. घरी अचानक एक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते.
लाडकी बहीण योजनेसाठी ४५,००० कोटी बाजूला काढायचे आहेत. त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल. पहिले कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते.
भरणे यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.