आघाडीत आगपाखड

By Admin | Updated: May 24, 2014 05:28 IST2014-05-24T05:26:51+5:302014-05-24T05:28:54+5:30

पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे.

Frontier | आघाडीत आगपाखड

आघाडीत आगपाखड

मुंबई : भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही झालेल्या पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे. शुक्रवारी दिवसभर आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बैठका-मेळाव्यांचा सिलसिला अखंड जारी होता. टिळक भवन येथे आज सलग दुस-या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत चिंतन बैठका झाल्या. यावेळी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राणे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीही जबाबदार असल्याचे सांगत राणे यांनी मित्रपक्षाला धारेवर धरले. त्यामुळे अंतर्गत धूसफूस, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या अधिकार क्षेत्र, अशा वादात अडकलेल्या काँग्रेसच्या बैठकीचा नूरच सायंकाळी पालटला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मनातील खदखद पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत व्यक्त केली. काँग्रेसने पवारांशी कधीही राजकीय चर्चा केली नाही, ज्यांनी घटक पक्षांची बाजू मांडायला हवी होती, ते डॉ. मनमोहन सिंग गेल्या दोन महिन्यांत दिसलेच नाहीत. संपुआवर टूजीपासून कोळसा पट्टे वाटपापर्यंत अनेक विषयात सातत्याने खोटे आरोप झाले, तरी डॉ. सिंग यांनी स्पष्ट शब्दांत बचाव केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी) मागील खेपेस पर्याय नव्हता. पण आता चित्र बदलले आहे, असे सांगत पवारांनी जास्त जागांचा आग्रह रेटण्यास सुरुवात केली आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीला बदल हवा असेल तर त्यांनी काँग्रेसकडून कडून घेतलेल्या जागा परत कराव्यात, असा टोला राणे यांनी हाणला.

Web Title: Frontier