प्रमोद महाजन ते अजित पवार...; महाराष्ट्राचे राजकारण हादरवून टाकणारे 4 मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:36 IST2026-01-28T18:32:43+5:302026-01-28T18:36:57+5:30
महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

प्रमोद महाजन ते अजित पवार...; महाराष्ट्राचे राजकारण हादरवून टाकणारे 4 मृत्यू!
महाराष्ट्र राजकारणातील एक धडाडीचा नेता तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) बारामती येथे भीषण विमान अपघातात निधन झाले. विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांकडे महायुती सरकारमधील एक महत्वाचे केंद्र म्हणून बघितले जात होते. आज हे शक्ती केंद्र हरपले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषत: एनसीपी गटांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. खरे तर, अजित पवारांच्या या अपघाती निधनाने, ज्यांच्या अकाली निधनामुळे राज्याची राजकीय समीकरणे बदलली गेली, अशा काही दिग्गज नेत्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
प्रमोद महाजन :
भाजपचे 'किंगमेकर' आणि चाणक्य मानले जाणारे महाजन आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना काळाच्या पडद्याआड गेले. ३ मे २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने भाजपचा एक आधुनिक आणि धोरणी चेहरा हरपला.
गोपीनाथ मुंडे :
गोपीनाथ मुंडे हे भाजपचे 'चंद्रगुप्त' म्हणून ओळखले जात होते. त्यांनी बहुजन समाजाला भाजपशी जोडले. केंद्रात ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर, ३ जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या कार अपघातात त्यांचे निधन झाले.
विलासराव देशमुख :
दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव हे काँग्रेसचा एक मोठा आधार होता. १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. काँग्रेससाठी हा एक मोठा झटका होता. तेदेखील एक सर्वसमावेशक नेता होते.
अजित पवार म्हणजे सहकार क्षेत्रातील 'दिग्गज' -
६६ वर्षीय अजित पवार यांनी १९९१ पासून सलग सात वेळा बारामतीचे प्रतिनिधित्व केले. सहकारी बँका, साखर कारखाने आणि दूध संघांवर त्यांची मोठी पकड होती. प्रशासकीय कार्यक्षमता आणि धाडसी निर्णयांसाठी ते ओळखले जात. २०२३ मध्ये त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला होता.
तीन दिवसांचा राजकीय शोक
या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.