प्रमोशन आणि पोस्टिंगसाठी अधिकारी टेकवायचे गुडघे! स्वतःच्याच जाळ्यात कसा अडकला अशोक खरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:54 IST2026-03-21T17:48:46+5:302026-03-21T17:54:43+5:30
महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातची एसआयटीमार्फत कसून चौकशी सुरु असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रमोशन आणि पोस्टिंगसाठी अधिकारी टेकवायचे गुडघे! स्वतःच्याच जाळ्यात कसा अडकला अशोक खरात
Ashok Kharat: एकीकडे मर्चेंट नेव्हीचा अधिकारी, दुसरीकडे १५ भाषांवर प्रभुत्व आणि तिसरीकडे स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवून घेणारा अंकशास्त्रज्ञ... अशा अनेक मुखवट्यांच्या आडून नाशिकसह महाराष्ट्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या अशोक खरात याचे काळे साम्राज्य अखेर उद्ध्वस्त झाले आहे. केवळ अंकशास्त्राच्या नावाखाली सर्वसामान्यांनाच नव्हे, तर राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही आपल्या शब्दांवर नाचवणाऱ्या या भोंदू बाबाचा खरा चेहरा आता पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
मर्चेंट नेव्ही ते 'महादेवाचा अवतार'
अशोक खरातच्या प्रवासाची सुरुवात मर्चेंट नेव्हीमधून झाली. जगभर फिरल्यामुळे त्याने इंग्रजीसह अनेक परदेशी भाषा आत्मसात केल्या. भारतात परतल्यानंतर त्याने दक्षिण भारतीय भाषांवरही प्रभुत्व मिळवले. याच काळात त्याने अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू या अंकशास्त्राला त्याने भोंदूपणाची जोड दिली. माझ्या शरीरात प्रत्यक्ष महादेव येतात, असे सांगून त्याने लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा यांचे अजब मिश्रण तयार केले. ब्लॅक मॅजिकच्या अफवा पसरवून त्याने अनेकांना मानसिक गुलाम बनवले.
दरबारात खाकी आणि पांढरपेशी भक्तांची हजेरी
खरातचा प्रभाव इतका मोठा होता की, नाशिकमधील त्याचे ऑफिस आणि सिन्नरमधील त्याचे देवस्थान येथे महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ये-जा होती. केंद्रीय मंत्री, राज्यातील बडे नेते, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या दिग्गजांशी त्याचे संबंध असल्याची चर्चा आता फोटोंमधून समोर आली. फक्त राजकारणीच नव्हे, तर पोलीस अधिकारीही स्वतःच्या बढतीसाठी आणि बदलीसाठी खरातच्या दरबारात अंकशास्त्राचा सल्ला घेण्यासाठी तासनतास थांबायचे.
पूजेच्या नावाखाली वासनेचा बाजार
खरातने महिलांना फसवण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धत अवलंबली होती. नोकरी, घरगुती समस्या किंवा अपत्यप्राप्तीसाठी येणाऱ्या महिलांना तो विशिष्ट पूजेसाठी नाशिकमधील त्याच्या ऑफिसमध्ये किंवा शेतात बोलवायचा. पूजा न केल्यास पतीचा मृत्यू होईल किंवा मुलाचे नुकसान होईल, अशी भीती घालून तो महिलांशी शरीरसंबंध ठेवायचा. काही महिलांना त्याने लग्नाचे आमिष दाखवले, तर काहींना अंकशास्त्राच्या नावाने ब्लॅकमेल केले. एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, सांगतोय ते करायला नकार दिल्यास पतीचे आयुष्य कमी होईल, अशी धमकी देऊन खरातने तिचे लैंगिक शोषण केले.
स्वतःच्याच जाळ्यात अडकला 'मास्टरमाइंड'
या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश अतिशय नाट्यमयरित्या झाला. सुरुवातीला खरातने स्वतःच खंडणीची तक्रार दिली होती. माझे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन काही लोक ५ कोटींची मागणी करत आहेत, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला, तेव्हा पोलिसांच्या हाती जे लागले ते धक्कादायक होते. खरातच्या ऑफिसमधील निलेश जाधव या कर्मचाऱ्याकडे खरातचे अनेक महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सापडले. खंडणी मागणाराच नव्हे, तर खंडणीची तक्रार देणारा खरात हा स्वतःच मोठा गुन्हेगार असल्याचे समोर आले.
१५ वर्षांत २०० कोटींची काळी कमाई
तपास यंत्रणांच्या अंदाजानुसार, खरातने केवळ १५ वर्षांत शून्यातून २०० कोटींचे साम्राज्य उभे केले. नाशिक येथे त्याची १५० कोटींची ३० एकर जमीन आहे. सिन्नरच्या मीरगाव येथे ४५ एकर जमीन आणि १० कोटींचे भव्य फार्महाऊस देखील आहे. तसेच पत्नी आणि मुलीच्या नावे ३० कोटींच्या जमिनी, ओझर विमानतळाजवळ ५ कोटींचा भूखंड, नाशिकमध्ये कोट्यवधींचे बंगले आणि ऑफिस देखील आहे.
एसआयटीकडून चौकशी
या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यात असलेले हाय-प्रोफाईल कनेक्शन पाहता, राज्य सरकारने या तपासासाठी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आता केवळ खरातच नव्हे, तर त्याला साथ देणारे अधिकारी आणि त्याच्या ट्रस्टमध्ये सहभागी असलेले राजकीय चेहरेही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.