पिंपरी : काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली. एकाचवेळी दोन्हीकडे सेवेत राहुन त्याने पगाराच्या रकमेपोटी २२ लाख ७५ हजार २२५ रुपये मिळवले. शासनाची त्यांनी फसवणूक केली. या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षणअधिकारी पराग एकनाथ मुंडे यांनी पोलिसांकडे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध फिर्याद दाखल केली होती. वाकड पोलिसांनी भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्यासह दहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे महेंद्र बामगुडे (लिपीक), रविंद्र बामगुडे, नवनाथ देवकर (प्रभारी मुख्याध्यापक), संगीता पाटोळे , नवनाथ देवकर, उल्का जगदाळे, जयश्री पवार, रामदास जाधव, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. या बाबतची सविस्तर माहिती अशी, प्रमुख आरोपी रविंंद्र नामदेव बामगुडे हा महेंद्र नामदेव बामगुडे नावाने भाऊसाहेब तापकीर विद्यालय काळेवाडी येथे लिपीक पदावर कायम स्वरूपी नोकरीस असताना त्याने पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक विद्यालय महापालिका शाळेत सेवक पदावर नोकरी मिळवली. एका संस्थेत कायम स्वरूपी नोकरी करत असताना, दुसऱ्या संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देवून त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेतला. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत शासनाची त्याने २२ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास आली. भाऊसाहेब तापकीर विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब तापकीर, सचिव मल्हारी तापकीर तसेच तत्कालिन प्रभारी मुख्याध्यापक नवनाथ रामदास देवकर, उल्का रणजीत जगदाळे तसेच संगीता पाटोळे, जयश्री पवार यांना ही बाब माहित असूनही त्यांनी ती लपवली. शासनाला वेळीच माहिती देण्याचे टाळले.
अशी ही बनवा बनवी... व्यक्ती एक ; नोकरी मात्र दोन सरकारी संस्थांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 19:17 IST
एका संस्थेत कायम स्वरूपी नोकरी करत असताना, दुसऱ्या संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देवून त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेत शासनाची त्यांनी फसवणूक केली.
अशी ही बनवा बनवी... व्यक्ती एक ; नोकरी मात्र दोन सरकारी संस्थांमध्ये
ठळक मुद्देसंस्थाचालकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत शासनाची त्याने २२ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक