चार नक्षलवाद्यांनी केली घिसू मट्टामीची हत्या

By Admin | Updated: May 31, 2014 00:57 IST2014-05-31T00:57:16+5:302014-05-31T00:57:16+5:30

एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

Four Naxalites killed Kali Ghasu Matthi's murder | चार नक्षलवाद्यांनी केली घिसू मट्टामीची हत्या

चार नक्षलवाद्यांनी केली घिसू मट्टामीची हत्या

आठवड्यात दोन हत्या : राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे दहशत
गडचिरोली : एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या  नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत  समोर आले आहे.
एटापल्ली येथे गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता पंचायत समिती सभापतीच्या निवासस्थानासमोर  मट्टामी बसून होते. त्यावेळी ४ ते ५ च्या संख्येत नक्षलवादी त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले.  बाहेर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी  जीव वाचविण्यासाठी घरात प्रवेश केला. त्यांच्या  पत्नी पंचायत समितीच्या सभापती ललीता मट्टामी घरात होत्या. त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू  आला. परंतु तोपर्यंंत नक्षलवाद्यांनी  घरात शिरुन त्यांच्यावर ५ ते ६ गोळ्या झाडून त्यांना ठार करुन  नक्षलवादी पळून गेले होते. 
याच दरम्यान गावाच्या बाहेर आणखी काही नक्षलवादी उभे होते, अशी एटापल्ली परिसरात चर्चा  आहे. त्यानंतर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात मट्टामी यांचा मृतदेह नेण्यात आला. परंतु तेथे त्यांच्या  मृतदेहावर शवविच्छेदन झाले नाही. त्यामुळे गडचिरोली येथे शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य  रूग्णालयात शवविच्छेदन करून हालेवारा या त्यांच्या मूळ गावी मृतदेह पोहोचविण्यात आला. या  आठवड्यात नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दोन राजकीय नेत्यांची हत्या केल्याने ग्रामीण  भागातील राजकीय वातावरण पुन्हा दहशतीखाली आले आहे. मध्यंतरी नक्षलवाद्यांवर पोलीस  वरचढ झाल्याचे चित्र निर्माण  झाले होते. परंतु आता पुन्हा नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे.
२५ मे रोजी रविवारी अहेरी तालुक्यातील निमलगुडम येथे माजी जि.प. सदस्य बापू तलांडी यांची  नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेची शाई वाळते न् वाळते तोच एटापल्ली पंचायत  समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली.  यापूर्वीही एटापल्ली पंचायत समितीचे सभापती राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवल सावकार  अतकमवार यांचीही नक्षलवाद्यांनी सायंकाळच्याच वेळी भर चौकात हत्या केली होती. तसेच  सायंकाळच्या सुमारास कंत्राटदार संजय खेडेकर यांचीही एटापल्ली गावातच नक्षलवाद्यांनी हत्या  केली होती. गुरूवारची ही तिसरी हत्या आहे. रविवारी याच आठवड्यात नक्षलवाद्यांनी माजी जिल्हा  परिषद सदस्य बापू तलांडी यांचीही निमलगुडम गावाजवळ अहेरी तालुक्यात हत्या केली. मट्टामी हे  हालेवारा गावचे राहणारे आहेत. त्यांचे तेथे घर व शेती आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी त्यांनी  गाव सोडून देऊन एटापल्लीत घर थाटले होते. राजकीय, सामाजिक जीवनात वावरताना जनतेचे  अनेक प्रश्न त्यांनी मांडले होते. त्यामुळे ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आले, अशी चर्चा आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Four Naxalites killed Kali Ghasu Matthi's murder