“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 18:09 IST2025-09-28T18:05:36+5:302025-09-28T18:09:40+5:30
Pradeep Sharma News: एक सेकंद जरी इकडे तिकडे झालो असतो तर माझा जीव गेला असता, असे सांगत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरे यांची जीव कसा वाचला, याबाबत मोठा खुलासा केला.

“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
Pradeep Sharma News: २००३ मध्ये मुलुंड येथे ट्रेनमध्ये स्फोट झाले होते. त्यातील जे वाँटेड होते, ते पाकिस्तानी आणि काश्मिरी होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हल्ला करण्याचा कट त्यांनी आखला होता. आमच्याकडे वाहन नंबर होता. तेव्हा सत्यपाल सिंग सह पोलीस आयुक्त होते, तर आर. एस. शर्मा सरही होते. त्यांनी मला सांगितले की, सांभाळून जा. बुलेटप्रुफ जॅकेट घालून लगेच तिथे गेलो. त्या जॅकेटला तेव्हा दोन गोळ्या लागल्या. दुपारी १२ वाजता आम्ही त्यांचे एन्काऊंटर केले. या तिघांना मातोश्रीवर हल्ला करायचा होता. त्यावेळी एक सेकंद जरी इकडे तिकडे झालो असतो तर माझा जीव गेला असता, असा थरारक प्रसंग माजी एन्काऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सांगितला.
प्रदीप शर्मा यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित ‘अब तक ११२’ नावाचा चित्रपट येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनेक प्रसंग प्रदीप शर्मा यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या जीवालाही धोका होता. त्यांच्यावरही हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. परंतु, आम्ही १० ते १२ नंबर ट्रॅक करत होतो. त्यात अचानक राज ठाकरेंचा उल्लेख झाला. राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता. राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते. त्यांच्या जीवाला धोका आहे हे आम्हाला समजले. आम्ही सगळी माहिती तेव्हा सह पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरेंना आयुक्त जाऊन भेटले आणि सांगितले की, तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही कोकण दौरा करू नका. त्यावेळी त्यांनी तो दौरा रद्द केला होता, असे प्रदीप शर्मा यांनी सांगितले.
सादिक कालिया दाऊद गँगचा प्रमुख शूटर
सादिक कालियाचा १२ डिसेंबर १९९७ ला एन्काऊंटर केला होता. सादिक कालिया दाऊद गँगचा प्रमुख शूटर होता. २२ हत्यांमध्ये तो स्वतः होता. तो वाँटेड होता. तो गँगमध्ये कसा आला होता, याची आम्ही माहिती काढली. आधी सादिक कालिया अरुण गवळीच्या गँगमध्ये होता. त्यात हत्येच्या सुपारीसाठी सादिकचा नंबर लागायचा नाही. त्याच्या बहिणीचा नवरा इप्तिकार म्हणून होता तो पण याच गँगमध्ये होता. इस्माइल मलबारी म्हणून दाऊदचा एक गँगस्टर होता. त्याला जाऊन हे दोघे भेटले आणि छोटा शकीलचा नंबर घेतला. छोटा शकीलला सादिकने सांगितले की, मला तुझ्या गँगमध्ये यायचे. त्यावर छोटा शकील म्हणाला तुला गवळीने पाठवले नाही कशावरुन?
सादिक कालिया म्हणाला की, तुम्ही सांगाल ते काम करतो. त्यावर छोटा शकील म्हणाला जा तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला ठार कर. सादिक म्हणाला हत्यार पाठवा. तर छोटा शकिल म्हणाला हत्यार नाही तुला त्याला चॉपरने मारायचे आहे. सादिकने त्याच्या मेहुण्याला म्हणजेच बहिणीच्या नवऱ्याला चॉपरने ठार केले. त्यानंतर तो छोटा शकीलबरोबर दाऊदसाठी काम करू लागला, असाही एक प्रसंग प्रदीप शर्मा यांनी सांगितला.