सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:35 IST2025-10-21T17:33:11+5:302025-10-21T17:35:19+5:30
उद्या जर पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत भाजपाच्या जास्तीत जास्त जागा आल्या त्यात मोठा गट तयार होईल असं सांगत सुभाष देशमुख यांनी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.

सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
सोलापूर - जिल्ह्यातील ४ माजी आमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दुफळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावी असं विधान केले आहे.
सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी त्यात काही अडचण नाही. आज जे येत आहेत ते सर्वजण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येत आहेत. उद्या जर पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत भाजपाच्या जास्तीत जास्त जागा आल्या त्यात मोठा गट तयार होईल. त्यात आजी-माजी आमदार सर्व एकत्र येत भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ देतील की नाही यात शंका आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच जरी भाजपाच्या चिन्हावर लोक निवडून आले तरीही निवडणूक आयोगाने जी नियमावली तयार करून दिली आहे. त्या नियमात बसून सर्वजण गेले तर काय करणार आहोत? आज ग्रामीणचे ६ माजी आमदार आपल्याकडे असतील. त्यात उद्या जर ५० टक्क्याहून अधिक लोक बाजूला गेले तर उद्या आम्हाला धोका आहे. त्यामुळे जे कुणी येत असतील त्यांना एका अटीवर घेतले पाहिजे. या जिल्हा परिषदेत आम्हाला भागीदारी नको, आज आमचे अनेक कार्यकर्ते रात्रदिवस झटून पक्ष वाढवतायेत. माझ्याकडे असंख्य कार्यकर्ते आले त्यांनी नाराजी दाखवली. पण मी काय करणार, जो पक्षाने निर्णय घेतलाय त्याच्याशी आपल्याला सहमत राहिले पाहिजे असं मी कार्यकर्त्यांना सांगितले असंही सुभाष देशमुख म्हणाले.
दरम्यान, खासदारकीला आम्हाला झटवून घ्यायचे, आमदारकीला आम्हाला झटवून काम करून घ्यायचे आणि आमच्या निवडणुका आल्या की भागीदार आणायचे असा कार्यकर्त्यांचा संताप आहे. कार्यकर्त्यांनी कुठे जायचे ही भावना त्यांची आहे. त्यामुळे मी कुठल्याही बैठकीला जात नाही. कुठे काय चाललंय ते मला माहिती नाही. माध्यमांत जेवढी माहिती तेवढीच मला माहिती आहे. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही आहोत परंतु नेतृ्त्वानेही उद्या जिल्हा परिषदेत धोका होऊ शकतो याची दखल घेतली पाहिजे असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने काँग्रेस-राष्ट्रवादीतील माजी आमदार भाजपात प्रवेश करत आहेत मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक भाजपा नेते नाराज असल्याचे चित्र पुढे आले आहे.