Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 20:31 IST2025-11-25T20:29:14+5:302025-11-25T20:31:57+5:30
आपल्या घराबाहेर नातवाला फिरवताना घडली घटना; सुदैवाने नातू सुरक्षित!

Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
नाशिक: इगतपुरीच्या माजी आमदार आणि शिवसेना(शिंदेगट) नेत्या निर्मला गावित यांना सोमवारी (दि. 24) घराबाहेर एका अज्ञात कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गावित गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कसा झाला अपघात?
निर्मला गावित सोमवार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आरडी सर्कल परिसरातील आपल्या निवासस्थानाबाहेर नातवाला घेऊन फेरफटका मारत होत्या. इतक्यात मागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, त्या काही फूट दूर जाऊन पडल्या. अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार झाला. सुदैवाने नातवाला कोणतीही दुखापत झाली नाही.
माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारची धडक, गंभीर जखमी pic.twitter.com/sQgYD8tLUJ
— Lokmat (@lokmat) November 25, 2025
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोऊनी हारुण शेख तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेला 24 तास उलटूनही कारचालक मोकाट असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित यांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, हा अपघात की घातपात, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कोण आहेत निर्मला गावित ?
निर्मला गावित या दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्या दोन वेळा इगतपुरीमधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2019 मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पुढे शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.