former mla harshwardhan jadhav threatens to suicide blames bjp leader raosaheb danve kg | VIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी

VIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वीच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. माझं काही बरंवाईट झाल्यास त्याला माझे सासरे आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जवळपास २० मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये जाधव यांनी भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

तुमच्या मुलीसोबतचे वैवाहिक संबंध सुधारण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला. पण तुम्ही तिची समजूत घालण्याऐवजी उलट मलाच धमक्या दिल्या. तुम्ही सत्तेत असल्यानं काहीही करू शकता. तुम्ही आधीच मला खूप त्रास दिला आहे. त्यामुळेच मी कोच्चीनला निघून जात आहे. तिथेही येऊन तुम्ही काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केलात, तर माझ्याकडे असलेल्या सायनाईडच्या गोळ्या खाऊन मी आत्महत्या करेन, अशी धमकी जाधव यांनी दिली आहे.तुम्ही कायम मला त्रास दिला. तरीही मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही कायम मला हीन वागणूक दिलीत. त्याचा मला कंटाळा आला आहे. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. तुम्ही मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास मी खरंच आत्महत्या करेन. पण त्यानंतर तुमचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतील. त्यानं काय होईल याचा विचार करा. मी तुमचे सगळे व्हिडीओ नामांकित वकिलांकडे देऊन ठेवले आहेत. ज्या दिवशी माझा जीव जाईल, त्या दिवशी ते व्हिडीओ व्हायरल होतील, असं जाधव यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये काय काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?
२६ मार्च २००३ ला संजना यांच्याशी माझा विवाह झाला. नवव्या महिन्यात आदित्य झाला. त्यानंतर संजनानं वैवाहिक संबंध तोडले. ते आजपर्यंत नीट झालेले नाहीत. तिच्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे मी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो. तिला पण नेलं. पण ती यायला तयार नव्हती. त्यामुळे घरात समस्या निर्माण झाल्या. आई वृद्धाश्रमात निघून गेली. 

२००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मला शिवसेनेची ऑफर होती. पण ती ऑफर माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही. कारण त्याची जबाबदारी तुमच्यावर टाकण्यात आली होती. त्याचवेळी मला ती ऑफर मिळाली असती, तर तेव्हाच आमदार झालो असतो. पण तसं झालं नाही. निवडणुकासाठी लागणारा पैसादेखील माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मला खडकेश्वरचा बंगला विकावा लागला. लोकांना वाटतं ते पैसे तुम्ही मला दिले. पण आमचा १२ हजार चौरस फुटांचा बंगला विकला गेला ते कोणाच्याही लक्षात नाही.

२००४ च्या निडणुकीत मी पराभूत झालो. २००९ च्या निवडणुकीलाही मी उभा राहिलो. त्यावेळीही पैसे नव्हते. त्यावेळी आम्ही मिटमिट्याची जमीन विकली. जी तुम्हीच अत्यंत कमी दरात घेतली. यलो झोनमधील जमीन तुम्ही साडे आठ एकरनं घेतली. पण आम्हालाही गरज असल्यानं आम्ही काही म्हटलं नाही. 

२००९ मध्ये मी आमदार झालो. २०१४ मध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली. मित्रमंडळींना केलेल्या मदतीमुळे निवडणूक जिंकलो. २०१९ मध्ये आधी लोकसभा निवडणूक लागली. मतदारसंघात माझं मोठं काम असल्यानं जिल्ह्यातल्या लोकांना आशा होती. त्यावेळी काँग्रेस आणि आणखी एक पक्ष मला तिकीट द्यायला तयार होता. पण त्यांना कुणीतरी मध्यस्थीसाठी हवं होतं. मात्र तुम्ही ती तयारी दर्शवली नाही. अनेक पत्रकारांना याची कल्पना आहे.

लोकसभेची निवडणूक स्वत:च्या हिमतीवर लढलो. मला २ लाख ८३ हजार मतं मिळाली. ही साधी गोष्ट नाही. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. लोकसभेत माझ्या मित्रांनी सगळा खर्च केल्यामुळे कोणाकडेच पैसे नव्हते. त्यामुळे गाड्या विकून २०१९ ची विधानसभा लढवली. त्यावेळी बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार उभे राहिले होते. बबनराव तुमचे (रावसाहेब दानवे) यांचे खास असल्यानं तुम्ही म्हणत नाही, तोपर्यंत किशोर पवार उभे राहू शकत नाहीत. त्यामुळेच हे सगळं तुम्हीच केल्याचा वास त्याच्यामधून येत होता. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर मी अडचणीत होतो. मला पैशांची कमतरता भासत होती. त्यामुळे मला खूप त्रास झाला.

मधल्या काळात अनेक गोष्टी झाल्या. संजना आणि माझे कोणतेही वैवाहिक संबंध नसल्यानं मी निराश होतो. मला नव्या साथीदाराची आवश्यकता होती. मी काही करायचा प्रयत्न केला. त्याचा तुम्हाला राग आला. तुम्ही माझ्याविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी तुम्हाला दिल्लीला भेटायला आलो. तुम्ही असं का करताय, याबद्दल विचारणा केली. पण उलट तुम्ही मलाच धमकावलं. मला आणि आईला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या. शेवटी आईनं पोलीस ठाण्यातला अर्ज मागे घेतला. पण तुमच्या मुलीनं अर्ज मागे घेतला नाही. अतिशय घाणेरड्या शब्दांत माझ्याशी बोललात. हा आपल्यामधला संस्कृतीचा फरक आहे. आम्ही स्वत:ची घरं भरली नाहीत, दुसऱ्यांची भरली. तुमचं मात्र तसं नाही.

संसार सुरळीत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तुमच्या मुलीनं ऐकलं नाही. तिला समजण्याऐवजी तुम्ही मलाच धमक्या दिल्या. मी माझ्या हिमतीवर लोकसभेला २ लाखांहून जास्त आणि विधानसभेला ६० हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. तुम्ही पंतप्रधान मोदींचा फोटो आणि कमळ बाजूला सारून निवडणूक लढवून दाखवा. तेव्हा तुम्हाला तुमची पात्रता कळेल. तुमचे सगळे छक्केपंजे असलेले व्हिडीओ माझ्याकडे आहेत. सगळ्या वकिलांना ते पाठवले आहेत. मी आत्महत्या केल्यावर ते व्हिडीओ बाहेर येतील. 

तुम्हाला मुलीला आमदार करायचं आहे. त्यासाठी मी पूर्ण पाठिंबा देईन. तुम्ही जगा आणि मला जगू द्या. तुमच्या त्रासाला कंटाळून तसाही मी आत्महत्या करणार होतो. तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकता. पण तसे प्रयत्न केले, तर मीच आत्महत्या करेन. मग तुमचे व्हिडीओ व्हायरल होतील. 
माझा पिच्छा सोडा, मी तुम्हाला विनंती करतो. माझा बंगला मी संजनाला द्यायला तयार आहे. मी कोच्चीनला जात आहे. तिथे मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका. तसा प्रयत्न केला, तर माझ्याकडे सायनाईडच्या गोळ्या आहेत. त्या खाऊन मी आत्महत्या करेन. तुम्हाला माझा खून करायचा असेल तर खुशाल करा. सत्तेतील माणूस काहीही करू शकतो. पण ज्या दिवशी माझा जीव जाईल, त्यावेळी तुमचे व्हिडीओ बाहेर पडतील.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: former mla harshwardhan jadhav threatens to suicide blames bjp leader raosaheb danve kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.