"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:06 IST2025-11-09T14:05:01+5:302025-11-09T14:06:55+5:30
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले.

"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
Tanaji Sawant: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. तानाजी सावंत यांनी जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर आणि त्यांच्यासोबत काम करण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंत यांनी केलेले हे विधान महायुतीमधील अंतर्गत तणाव स्पष्टपणे दर्शवत आहे.
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. युतीची तत्त्व माहीत नाही तर कशासाठी युती करता. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी सांगत होतो, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं.
"राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसे होते तसे यांचे होते. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत वेगवेगळ्या नाहीत. याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल. कुणाला पटो अगर न पटो माझी मतं आहेत ती आहेत," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.
त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने तानाजी सावंत चांगलेच संतापले. "त्यांनी हिंदुत्व स्विकारलं का? युतीची ध्येय धोरणे त्यांना मान्य आहेत का? मग का यांना आमच्यावर लादता आहात, याची गरज होती का? गरज नसताना तुम्ही त्याला सोबत घेतलं आहे आणि ते आम्हाला मान्य नाही," असंही तानाजी सावंत म्हणाले.
दरम्यान, धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. भूम परंडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप ठाकरे गटासोबत लढणार असल्याचे म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेमुळे अजित पवारांचा पक्षही आक्रमक झाला आहे.तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाल्याचीही चर्चा आहे. त्यानंतर सावंतांनी ही एकला चलो रे चा नारा दिला आहे. भाजप शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे.आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.