काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह केला भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:56 IST2025-07-31T18:56:36+5:302025-07-31T18:56:49+5:30

Maharashtra Politics: काँग्रेसमधून आजी-माजी आमदार, बडी नेतेमंडळींचे 'आऊटगोईंग' थांबेना...

Former Congress MLA from Jalna Kailash Gorantyal joins BJP ahead of municipal corporation elections | काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपा या निवडणुकांसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. गेल्या काही महिन्यांत भाजपामध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले आहेत. विशेषत: काँग्रेस पक्षातील अनेक नेतेमंडळी पक्ष सोडताना दिसत आहेत. तशातच आता काँग्रेसला जालन्यात आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.

रविंद्र चव्हाण म्हणाले, "जमिनीवरचा कार्यकर्ता असलेले गोरंट्याल हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी महायुती सरकार आणि आमची आहे. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, 'विकसित भारत' आणि 'विकसित महाराष्ट्रा'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरेल आणि भाजपा या सर्वांना पाठबळ देईल असा मला विश्वास आहे.



पक्षप्रवेशावेळी गोरंट्याल काय म्हणाले?

"भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नसून केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला. जालन्याच्या येत्या महापालिका निवडणुकीत महापौर भाजपाचा होणार याची ग्वाही देतो. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेन," असेही गोरंट्याल यांनी सांगितले.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेता अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, शिक्षादेवी ढक्का, जगदीश भारतीया, विजय चौधरी, विनोद रत्नपारखे, संगीता पाजगे, आनंद वाघमारे, ग्रामीणचे सरपंच गोविंद पवार, सुनील चिरखे, सरपंच मनोहर सूळसुळे, अंबादास लोंढे, तालुका उपाध्यक्ष संतोष देव्हडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोरे, बाळूकाका सिरसाट, किशोर कावले, पंचायत समिती माजी सदस्य समाधान शेजुळ यांचा समावेश आहे. शरद पवार गट आणि उबाठा गटातीलही काही कार्यकर्त्यांनी आज याच कार्यक्रमात भाजपा प्रवेश केला.

Web Title: Former Congress MLA from Jalna Kailash Gorantyal joins BJP ahead of municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.