मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:04 IST2025-09-26T07:02:52+5:302025-09-26T07:04:59+5:30
आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
पुणे : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी तसेच ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.
राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हे पंचनामे करताना शेतीचे नुकसान झाल्याचे जीपीएस अद्ययावत असलेले फोटो काढले जात आहेत. तसेच ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या क्रमांकाचाही पंचनाम्यामध्ये समावेश केला जात आहे. ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे.
जीपीएसमधून फोटो आवश्यक
नुकसानग्रस्त पिकांचा फोटो जीपीएसमधून काढून त्यावर अक्षांश व रेखांश असणे आवश्यक आहे. असे फोटो ग्रामसेवक आपल्याकडे ठेवत आहेत. सध्या तरी हे पंचनामे ऑफलाइन करण्यात येत आहेत. गरजेनुसार अहवालाला हे फोटो लावण्यात येतील. सरकारने नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी निकष लावण्याचे आदेश यापूर्वीच दिले असून त्यानुसारच पंचनामे सुरू आहेत, असे सुत्रांनी स्पष्ट केले.
नोंद न केलेल्यांचे काय?
राज्यात आतापर्यंत केवळ ५६ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर अर्थात ई-पीक पाहणीमध्ये झाली आहे. त्यामुळे मदत करताना नोंद न केलेल्या शेतकऱ्यांचे काय?
भाजपचे आमदार-खासदार महिन्याचे वेतन देणार
राज्याच्या विविध भागांत पूर व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे सर्व आमदार व खासदार महिन्याभराचे वेतन मदतनिधीत देणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का? ठाकरे
‘पावसाने तुमची शेती नाही तर आयुष्य वाहून गेलं आहे. प्रत्येकवेळी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगता, तुमची ही योग्य वेळ कधी येणार आहे? का यासाठीही तुम्ही पंचांग पाहणार आहात? असा थेट सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला गुरुवारी केला. सरकारने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कळंब तालुक्यातील इटकूर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.