महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:21 IST2020-02-05T05:30:07+5:302020-02-05T06:21:30+5:30
राज्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक खूशखबर लवकरच मिळू शकते. पाच दिवसांचा आठवडा करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून रोज कामाची ४५ मिनिटे वाढवून तसा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांसह झालेल्या बैठकीत मांडली.
राज्यात पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात लवकरात लवकर प्रशासनाने आपल्याकडे प्रस्ताव पाठवावा, अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. वेतन त्रुटीबाबतचा अहवाल महिना-दीड महिन्यात सादर केला जाईल, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले. महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
राज्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई आदी उपस्थित होते.