महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 09:29 IST2025-12-06T09:26:57+5:302025-12-06T09:29:18+5:30
प्रचारात एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे म्हणत आहेत... आमच्यात मनभेद नाहीत, मतभेद आहेत : चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे माझे नेते आहेत : नीलेश राणे, आम्ही एकत्रच : रवींद्र चव्हाण

महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
मुंबई : राज्यातील महायुती सरकारमधले भाजप आणि शिंदेसेना नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांना भिडल्याचे चित्र नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारकाळात बघायला मिळाले होते. एकमेकांवर त्यांनी जोरदार तोफ डागली. मात्र, आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नरमाईची भाषा सुरू केली आहे. या आठवड्यात एकत्रित बसून ते मतभेद दूर करणार आहेत.
सत्तारूढ महायुती विरुद्ध विरोधी महाविकास आघाडी या संघर्षापेक्षाही राज्यात अनेक ठिकाणी लढाई बघायला मिळाली ती भाजप आणि शिंदेसेनेमध्ये. कोकणापासून विदर्भापर्यंत त्याचे पडसाद उमटले. एकमेकांना पाहून घेण्यापासून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या, ‘भाजपवर उद्या चालून एकटे लढण्याची वेळ येऊ शकते’, या इशाऱ्यापर्यंत दोन पक्षांमधील संबंध ताणले गेले. मात्र, नगरपरिषद निवडणुकीला दोन दिवस होताच आता दिलजमाईची भाषा सुरू झाली आहे.
...आता रडारवर आहे मुंबई महापालिकेची निवडणूक
नगरपरिषदांनंतर आता महापालिकांची निवडणूक होणार असून त्या मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमध्ये नगरपरिषदांपेक्षाही मोठा राडा भाजप-शिंदेसेनेत होण्याची शक्यता वर्तविली जात असताना आता दोन्ही पक्षांनी एकमेकांना सहकार्याचा हात देण्याची भूमिका घेतली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, एकमेकांच्या माणसांचे प्रवेश घ्यायचे नाहीत असा निर्णय भाजप-शिंदेसेनेत झाला आहे. मतभेदांच्या मुद्यांवर येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्टता येईल.
दिलजमाईची भाषा का?
एकमेकांच्या विरोधात लढल्याचा फटका भाजप आणि शिंदेसेनेलाही महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये बसणार असा अंदाज वर्तविला जात आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठिकठिकाणाहून घेतलेल्या माहितीमध्येही हे समोर आले असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. म्हणूनच आता एकत्र राहण्यावर भर दिला जात असल्याचे म्हटले जाते. नगरपरिषदांपेक्षाही महापालिका निवडणूक अधिक महत्त्वाची आहे. म्हणून आता एकीचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही एकमेकांचे काही प्रवेश घेतल्याने वाद वाढले. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी दोन दिवसांपूर्वी चर्चा झालेली आहे. विषय अधिक वाढवू नये, असे त्यांनी मला सांगितले आहे. आपण काय करावे, याबाबत देवेंद्रजी, मी एकत्र बसणार आहोत, शिंदेंशीही आम्ही चर्चा करू. सगळ्या वादांवर पडदा पडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. - आ.रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप.
आमच्यात मनभेद नाहीत, मतभेद असू शकतात आणि ते चर्चेतून दूर केले जातील. या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मी असे एकत्र बैठक करून मतभेद दूर करू. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणही माझे नेते आहेत. मी त्यांना नक्की भेटेन. माझे चव्हाण यांच्याशी काहीही वैयक्तिक वाद नाहीत. महायुतीने एकत्रितपणेच लढले पाहिजे तर मग अपेक्षित निकाल नक्कीच मिळू शकेल. -नीलेश राणे, शिंदेसेनेचे आमदार.