‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:52 IST2025-05-19T08:51:37+5:302025-05-19T08:52:26+5:30
पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या. आगीचे रौद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंंदी केली. मदतीसाठी ‘सीआरपीएफ’चे पथकही आले. त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आग आटोक्यात आणण्याच्या कामात मदत केली.

‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार
सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंटर टेक्सटाइल या टाॅवेल निर्मिती कारखान्याला रविवारी पहाटे ३ वाजता लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात कारखानदाराच्या कुटुंबातील चार जणांसह एकाच कुटुंबातील चार कामगारांचा समावेश आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. १५ तासांनंतरही आग आटोक्यात आणण्यासाठी ६० हून अधिक बंबांच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या. आगीचे रौद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंंदी केली. मदतीसाठी ‘सीआरपीएफ’चे पथकही आले. त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आग आटोक्यात आणण्याच्या कामात मदत केली.
दाेन कुटुंबे भस्मसात -
कारखान्याचे मालक उस्मान हाशम मन्सुरी (८७), त्यांचा नातू अनस हनिफ मन्सुरी (२४), नात सून शिफा अनस मन्सुरी (२४) व अनसचा मुलगा युसूफ मन्सुरी (१ वर्ष) हे चाैघे मालकाच्या कुटुंबातील आहेत.
कामगार मेहताब सय्यद बागवान (५१), आशाबानो मेहताब बागवान (४५), सलमान मेहताब बागवान (२६), हिना वसीम शेख (२४) हे चार जणदेखील एकाच कुटुंबातील आहेत.
मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख : मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणांचा गुदमरून मृत्यू -
हैदराबाद : येथील ऐतिहासिक चारमिनार लगतच्या गुलजार हाउसमधील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
रविवारी सकाळी बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. मात्र, काही क्षणात या आगीने संपूर्ण इमारतीला कवेत घेतले. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकमेव अरुंद मार्ग होता. मात्र, भीषण आगीमुळे बाहेर पडता न आल्याने बहुतांश जणांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. सकाळी सव्वा सहा वाजता आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन विभागाला माहिती मिळाली. या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाच्या बंबांनी काही वेळात या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. या इमारतीत २१ लोक होते.
कारणांची चाैकशी सुरू -
१७ जणांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.
तेलंगणाचे मंत्री पन्नम प्रभाकर यांनी सांगितले की, इमारतीत राहणारे बहुतेक लोक मरण पावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचे एक्सद्वारे जाहीर केले.