ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:37 IST2025-02-28T12:41:34+5:302025-02-28T13:37:54+5:30

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार

Financial indiscipline in the state due to Thackeray government BJP State Vice President Madhav Bhandari's criticism | ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

सातारा : ‘शासनाकडून सवलत, मोफत योजना सुरू आहेत. राज्याचा अर्थसंकल्पही जाहीर होणार आहे, पण मागील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्यात आर्थिक गैरशिस्त केल्यानेच सध्या काही प्रश्न निर्माण झाले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भंडारी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष भंडारी म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा आणि मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. तसेच शेतकरी, गरीब, महिला आणि युवा या विकसित भारताच्या चार प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे कामही अर्थसंकल्पाने केले आहे. या अर्थसंकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत.

दरम्यान, यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांनाही भंडारी यांनी उत्तरे दिली, तर कंत्राटदार आणि अनेक शासकीय योजनांची बिले थकली आहेत. लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम आहे का ? असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. यावर भंडारी यांनी मागील ७५ वर्षांत राज्यातील ठेकेदार रस्त्यावर कधी आले नव्हते, पण ठाकरे सरकारने आर्थिक गैरशिस्त केल्याने प्रश्न निर्माण झालेत, असे सांगितले.

तसेच राज्यातील बांबू लागवडीच्या प्रश्नावर त्यांनी बांबूपासून इथेनाॅल निर्मिती होणार आहे. यामुळे कितीही बांबू लावला तरी नुकसान होणार नाही. तसेच प्रक्रिया उद्योग तयार केल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर कोयनेची संकलन यादी भाजपने केली. या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार, असेही त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर दिले.

भाजप पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन..

पत्रकार परिषदेपूर्वी भाजपची सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहातच झाली. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष भंडारी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प उकल करून सोप्या भाषेत सांगितला. तसेच पदाधिकाऱ्यांनाही लोकांत जाऊन त्यांना अर्थसंकल्पाचे मुद्दे समजून सांगावेत, अशी सूचनाही केली.

Web Title: Financial indiscipline in the state due to Thackeray government BJP State Vice President Madhav Bhandari's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.