VIDEO: रिक्षातून उडी मारली, आरोपीची कॉलर धरली; नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याचा फरार आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:12 IST2025-10-24T16:49:29+5:302025-10-24T17:12:42+5:30
नाशिकमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत एका फरार असलेल्या आरोपीला अटक केली.

VIDEO: रिक्षातून उडी मारली, आरोपीची कॉलर धरली; नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याचा फरार आरोपी जेरबंद
Nashik Crime: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवत असलेल्या नाशिकपोलिसांनी गुंडगिरीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. नाशिकच्या एका गजबजलेल्या बाजारात, दरोड्याच्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे थरारक कारवाई केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत होते. २२ ऑक्टोबरच्या सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या भरबाजारात पोलिसांना या आरोपीची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एका दुकानाजवळ आरोपी बाइकवर उभा होता. त्याचवेळी एक ऑटो तिथे येऊन थांबला आणि त्यातून साध्या वेशातील तीन पोलीस कर्मचारी क्षणात खाली उतरले.
पोलीस येत असल्याचे पाहताच बाइकवरील आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तिघांपैकी एका धडधाकट पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि आरोपीची कॉलर पकडली. जीव वाचवण्यासाठी आरोपीने वेगाने बाइक पळवली. पण पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे कॉलर सोडली नाही. आरोपीने बाईक पळवत पुढे घेऊन गेला. त्याच्यामागे अन्य दोन पोलीसही धावले.
काही वेळ चाललेला हा प्रकार एखाद्या ॲक्शनपटापेक्षा कमी नव्हता. काही अंतर धावल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला घेरून ताब्यात घेतले. सुरुवातीला बाजारात उपस्थित असलेल्या लोकांना नक्की काय घडत आहे, हेच कळले नाही.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला थरारक पाठलाग...! 🏍️💨
— नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) October 23, 2025
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून फरार असलेला आरोपी, ज्याने एका ओळखीच्या व्यक्तीला धमकावून त्याची मोटारसायकल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली होती.. तो सणासुदीच्या गर्दीत शहरात लपून राहू शकेल असा समज करून नाशिकमध्ये प्रवेश केला.… pic.twitter.com/M55u8AE01k
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून फरार असलेला आरोपीने एका ओळखीच्या व्यक्तीला धमकावून त्याची मोटारसायकल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. त्याने सणासुदीच्या गर्दीत शहरात लपून राहू शकेल असा समज करून नाशिकमध्ये प्रवेश केला. परंतु पंचवटी गुन्हे शोध पथकाने त्याचा थरारक पाठलाग करून गजाआड करत तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले.
दरम्यान, या घटनेने नाशिक पोलिसांच्या 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' या मोहिमेला बळ मिळाले आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.