जीवाची बाजी लावली; महापुरातून १५० जनावरांना बाप-लेकाने काढले सुखरूप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:31 IST2025-10-02T12:30:12+5:302025-10-02T12:31:29+5:30
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी आपल्या जनावरांना जागेवरच सोडून स्थलांतर केले.

जीवाची बाजी लावली; महापुरातून १५० जनावरांना बाप-लेकाने काढले सुखरूप!
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी आपल्या जनावरांना जागेवरच सोडून स्थलांतर केले. मात्र, केवड (ता. माढा) येथील शाबू चव्हाण व मदन चव्हाण या बापलेकाने नदीपात्राजवळील पाच किमी अंतरावरील पुरात बुडालेल्या १५० जनावरांना वाचवण्यात यश मिळवले.
जागेवर बांधलेल्या जनावरांना व वाहत आलेल्या जनावरांना सोडून दोघांनी पाणी नसलेल्या उंच ठिकाणच्या वस्तीवर आणून बांधले. पूर कालावधीत स्वतः दोन दिवस उपाशी राहूनदेखील जनावरांना मात्र उसाचा चारा भरविल्याचे समोर आले. परिसरात निर्माण झालेल्या महापुराच्या भयंकर संकटात शेकडो जनावरे दगावली. मात्र, केवड (ता. माढा) येथील मुसळे वस्तीवरील या बापलेकाने अशा काळात केलेल्या कार्याचे गावात कौतुक होत आहे.
उसाचा चारा भरवून जगविले
नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रातील ओरडणारी जनावरे पाहू वाटेनासे झाली होती. यामुळे ती सोडवून आणत मी चोहोबाजूने पुराचे पाणी असताना देखील पाणी नसलेल्या उंच उंच ठिकाणी वारंवार घेऊन जात त्यांना उसाचा चारा भरवीत पुरातून वाचवण्याचे काम केले आहे. याने मला खूप समाधान लाभले.
मदन चव्हाण, शेतकरी, केवड