...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:13 IST2025-05-05T17:09:53+5:302025-05-05T17:13:26+5:30
Groom Died on Wedding Day: संसाराची स्वप्न रंगवली, पण सुरू होण्याआधीच नियतीला साथीदाराला हिरावून घेतलं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नवरीच्या मांडीवर नवरदेवाने प्राण सोडले. गडचिरोलीत ही घटना घडली.

...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
Maharashtra News: सुखी संसाराची स्वप्ने पाहत त्या दोघांनी रेशीमगाठ बांधली. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभही झाला. मात्र, पोटात वेदना होत असल्याचे निमित्त झाले अन् नवरीसह उपचारासाठी दवाखान्यात जाताना वेदना असहा झाल्या. अखेर जीवनसाथीसोबतच्या पहिल्या प्रवासातच नवरदेवाने तिच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काळीज पिळवटणारी ही घटना तालुक्यातील गहाणेगोटा येथे ३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. नारायण कंवलसिंह बोगा (२६, रा. गहाणेगोटा) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. तो शेती व मजुरीकाम करायचा.
आधी पती गेला आता मुलगा
१५ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून आई आणि नारायण दोघेच राहायचे. परिस्थितीशी दोन हात करत माय-लेकरे गुजराण करत होते. उपवर झाल्यानंतर नारायणसाठी स्थळ शोधणे सुरू झाले. ३० एप्रिलला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दीपिका या मुलीशी त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला.
वाचा >>कौटुंबिक कलाहातून पतीपत्नीने संपवले जीवन; दोघांच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली पोरकी
दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणने गावी स्वागत समारंभघेतला. यावेळी त्याने गोडधोड जेवणाचा बेत आखला होता.
लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला.
पोटात वेदना सुरू झाल्या आणि तो गेलाच
२ मे रोजी देखील त्याची प्रकृती बरी होती. मात्र, ३ मे रोजी पुन्हा त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्यामुळे नववधू दीपिका व एका मित्राला सोबत घेऊन दुचाकीवरून तो वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली.
मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकले आणि प्राण सोडला. विशेष म्हणजे नारायण स्वतः दुचाकी चालवित होता. लग्नानंतर पत्नीसोबतचा त्याचा पहिलाच प्रवास होता, परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते.
लग्नघरी शोककळा
नारायण व दीपिका यांचे लग्न होऊन तीनच दिवस झाले होते. अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच नारायणला नियतीने हिरावून घेतले. त्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले.
लग्नामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण या घटनेने हे क्षण दुःखात बदलले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.