चर्चा तर होणारच!; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील एकत्र आले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले
By प्रमोद सुकरे | Updated: January 6, 2026 16:38 IST2026-01-06T16:31:51+5:302026-01-06T16:38:33+5:30
शेतकरी संघटनेच्या नेत्यांची समाज माध्यमातून व्हायरल छबी चर्चेत

चर्चा तर होणारच!; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील एकत्र आले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले
प्रमोद सुकरे
कराड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी, रयत क्रांती व बळीराजा या संघटनांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, रयत शेतकरी संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्यातील सध्याचे सख्य सर्वश्रूत आहे. पण, शनिवारी हे तिन्ही नेते एकत्र आले. त्यांचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले. त्याबाबत चर्चा झाल्या नाहीत तरच नवल! अनेकांना तर त्यामुळे सुखद धक्काही बसला. कार्यकर्त्यांनी मग त्याचा मागोवा घेतला तेव्हा न्यायालयाच्या तारखेवेळी हे एकत्रित आले होते हे समोर आले.
पाचवड फाटा (ता. कराड) येथे २०१४मध्ये ऊस दरासंदर्भात शेतकरी संघटनेचे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी सातारजवळ एक बस जाळल्याची घटना घडली होती. त्याची तारीख सातारच्या कनिष्ठ न्यायालयात बरेच वर्षे सुरू आहे. शनिवारी त्याच्या सुनावणीसाठी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील आदींना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस होती.
त्यामुळे दुपारी ३:००च्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी न्यायालयात पोहोचले होते.
इस्लामपूरहून निघालेल्या सदाभाऊ खोत यांची गाडी अगोदर टाळगाव (कराड) येथे गेली. त्यांनी आजारी असलेल्या पंजाबराव पाटील यांना गाडीत घेतले. दुपारी चार वाजता ते न्यायालयात पोहोचले. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी न्यायालयासमोर हजेरी लावली. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंजाबराव पाटील आवारात गाडीतच बसून होते.
न्यायालयातून बाहेर पडताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीत बसलेल्या पंजाबराव पाटील यांच्याकडे जात त्यांची विचारपूस केली. त्यावेळी कोणीतरी आपला एकत्रित फोटो घेऊया, असे म्हटले. मग सगळे एकाच फ्रेममध्ये दिसले. तो फोटो शेतकरी चळवळीसाठी काम करणाऱ्या विविध ग्रुपमध्ये व्हायरल झाला. मग त्याबाबत चर्चा तर होणारच!
एकाच लिफ्टमधून उतरले खाली!
न्यायालयातील काम आटोपल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सचिन नलवडे व प्रमुख पदाधिकारी एकाच लिफ्टमधून खाली उतरले. त्यावेळी आपण अजून किती दिवस या तारखा खेळत बसायच्या हे माहीत नाही? कुठे कुठे कशा तक्रारी आहेत, माहिती नाहीत, अशा चर्चा त्यांच्यात झाल्या.
गुरुवारी पुन्हा एकत्रित येणार
न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी ठेवली आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा ही तिन्ही नेते मंडळी सातारच्या न्यायालयात एकत्र पाहायला मिळणार आहेत. पण, सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, मतभेद, मनभेद विसरून हे नेते पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्रित दिसणार का? काळाच्या पोटात काय दडलंय कोणास ठावूक?