शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ! मुलीच्या लग्नासाठी विकली बैलजोडी; वयोवृद्ध मायबापाच्या हाती ‘जू’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:12 IST2025-07-08T09:12:15+5:302025-07-08T09:12:35+5:30
वैजनाथ सूर्यवंशी यांच्या नावावर दोन लाखांचे कर्ज असून, कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जमिनीची फोड केली.

शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ! मुलीच्या लग्नासाठी विकली बैलजोडी; वयोवृद्ध मायबापाच्या हाती ‘जू’
महेबूब बक्षी
औसा (जि. लातूर) : आधी अस्मानी, तर कधी शेतीमालाला दर नसल्याने सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होत नाही. संकटांना तोंड देत औसा तालुक्यातील शिवणी बु. येथील वैजनाथ सूर्यवंशी (वय ७५) व सत्यभामा सूर्यवंशी (वय ७२) हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य दहा वर्षांपासून जवळपास सहा एकर शेतीची मशागत स्वत: करीत आहेत. पेरणी झाली की मग कोळपणीसाठी स्वत:च्या खांद्यावर जू घेऊन बैलाप्रमाणे राबतात.
वैजनाथ सूर्यवंशी यांना दोन मुली आणि एक मुलगा. मुलगा लातुरात किराणा दुकानात नोकरी करतो. शेतीतून निघालेल्या उत्पन्नातूनच मुलीचे लग्न केले. लग्नात झालेल्या खर्चामुळे शेतीसाठी बैलजोडी घेता आली नाही.
तरीही दोघांनी खचून न जाता मशागतीचे काम सुरूच ठेवले. पेरणी ते दुसऱ्याकडून करून घेतात. पण, कोळपणीसह इतर मशागतीसाठी पती जू खांद्यावर घेतात, तर पत्नी खंबीरपणे साथ देते. हे सत्र तब्बल दहा वर्षांपासून सातत्याने सुरू असून, आजही त्यांच्या खांद्यावरील जू उतरलेला नाही. वैजनाथ सूर्यवंशी यांच्या नावावर दोन लाखांचे कर्ज असून, कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जमिनीची फोड केली.
उत्पन्नच कमी, बैलजोडी खरेदी करावी कशी?
दिवसाला एकरभर रान ओढणाऱ्या वयोवृद्धांची हिम्मत कमालीची असून, दररोज अंगदुखी, हात सुजणे, पायदुखी होते. पण सवय आणि गरज हे सर्व वेदना सहन करण्याची ऊर्जा देत असल्याचे वैजनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.