बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:54 IST2025-10-01T10:47:57+5:302025-10-01T10:54:48+5:30
NCRB Report Maharashtra: जुन्या नोटा व्यवहारातून बंद केल्यानंतरही देशभरात बनावट नोटांची छपाई आणि त्यांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे.

बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
देशभरात बनावट नोटा तयार करण्याच्या 'फॅक्टरी' वेगाने वाढत आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला, पण नोटबंदी करूनही त्याला रोखता आलेले नाही. नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये बनावट नोटांची छपाई होत असलेल्या राज्यांमध्ये दिल्लीच पहिल्या क्रमांकावर आहे. या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रही रेल्वेमधील गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
बनावट नोटांची छपाई वाढली
एनसीआरबीने २०२३ चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यात २०२३ मध्ये देशभरात ३ लाख ५१ हजार ६५६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत १६.८६ कोटी रुपये इतकी आहे.
नकली नोटांच्या प्रकरणामध्ये राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. यात २००० हजारांच्या नोटाही सामील होत्या. दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, तिसऱ्या क्रमांकावर आसाम आणि चौथ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १४५७ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यात २००० रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
रेल्वेतील चोरीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिला
एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, रेल्वेमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. २०२३ या एकाच वर्षात महाराष्ट्रात २२ हजार १५७ घटना घडल्या.
महाराष्ट्रानंतर रेल्वेत चोरी होण्याचे गुन्हे हरयाणामध्ये घडले आहेत. हरयाणामध्ये १०६८५ गुन्ह्यांची नोंद झाली. मध्य प्रदेशात १०५६१, उत्तर प्रदेशात ४६७२, बिहारमध्ये ३२४०, तर गुजरातमध्ये २२४९ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
ओडिशात महिलांवर सर्वाधिक हल्ले
२०२३ या वर्षात महिलांवर सर्वाधिक हल्ले झाल्याच्या घटना ओडिशामध्ये घडल्या आहेत. महिलांना निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ले, तसेच मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली ओडिशात १९७८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. उत्तर प्रदेशात १७५० गुन्हे दाखल झाले.