Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 19:05 IST2022-05-25T18:45:58+5:302022-05-25T19:05:16+5:30
संभाजीराजेंची काही महत्त्वाची विधानं 'लोकमत'ने क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून पोस्ट केली. त्यापैकीच, एका क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, संभाजीराजे जे बोललेलेच नाहीत, असं विधान त्या फोटोवर टाईप आणि मॉर्फ करून काही जण ते व्हायरल करत आहेत.

Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला!
राज्यसभेच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नाव रोजच बातम्यांमध्ये आहे. शिवसेनेनं उमेदवारीसाठी त्यांच्यापुढे ठेवलेली अट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात झालेली चर्चा, त्याआधी शरद पवारांनी त्यांना जाहीर केलेला पाठिंबा, त्यानंतर संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका, या घडामोडींनी राजकीय वर्तुळात बराच धुरळा उडाला. या सगळ्या बातम्या 'लोकमत'ने कव्हर केल्या. हे अपडेट्स सोशल मीडियावरही शेअर केले. संभाजीराजेंची काही महत्त्वाची विधानं क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून पोस्ट केली. त्यापैकीच, एका क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, संभाजीराजे जे बोललेलेच नाहीत, असं विधान त्या फोटोवर टाईप आणि मॉर्फ करून काही जण ते व्हायरल करत आहेत. त्यावर 'लोकमत'चा लोगो असल्यानं आणि 'लोकमत' हे विश्वासार्ह नाव असल्यानं, बऱ्याच जणांना ते खरं वाटू शकतं. म्हणूनच, आम्ही आमच्या मूळ क्रिएटिव्हची लिंक आणि फेक इमेज दोन्ही आपल्यापुढे ठेवत आहोत.
संभाजीराजेंशी थेट बातचीत करून 'लोकमत'ने २४ मे रोजी एक्स्लुझिव्ह बातमी केली होती. "खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार" असं त्या बातमीचं शीर्षक होतं.
याच बातमीच्या शीर्षकावरून आम्ही एक क्रिएटिव्ह केलं आणि ते फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलं होतं.
याच क्रिएटिव्हवरील मजकूर, संभाजीराजेंचं विधान बदलून मॉर्फ्ड इमेज कुणीतरी तयार केली आणि ती सोशल मीडियावर पोस्ट केली. "उमेदवारी देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी मला अगोदरच सांगितलं होतं", असं विधान मूळ विधानाच्या जागी देण्यात आलं. वास्तविक, असं कुठलंही विधान संभाजीराजे यांनी केलेलं नाही. तशी बातमी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही किंवा तसा व्हिडीओही नाही.
त्यामुळे यापैकी फेक इमेज तुमच्यापर्यंत आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. उलट, ही इमेज पाठवणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्तीला यामागचं सत्य काय आहे सांगा!