महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:21 IST2025-11-18T16:10:29+5:302025-11-18T16:21:16+5:30
Mahayuti News: महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला.

महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांनी इतर पक्षांमधील नेत्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवण्यास सुरुवात केली होती. त्यातच महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला. शिवसेना शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे वगळता इतर सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सांमत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी धाव घेतली.
मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. तसेच ‘तसेच, ‘तुम्ही जे करत आहात, ते योग्य नाही’, असे शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जरा घुश्श्यातच सांगितलं. त्यावर ‘तुम्हीच उल्हासनगरमधून याची सुरुवात केली’, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली फोडाफोडी, विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय आणि पुरवण्यात येणारा निधी, तसेच आपल्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना भाजपात देण्यात येत असलेला प्रवेश ही या नाराजीची कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्पार केली असतानाच शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं वृत्त आलं आहे. आज अद्वय हिरे यांच्या भाजपामध्ये होणाऱ्या प्रवेशाला रोखण्यासाठी सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या घरी धाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रवींद्र चव्हाण घरी उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान, शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थितीबाबत विचारलं असता नाराजीचं कुठलंही कारण नाही आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले की, योगेश कदम हे खेडमध्ये आहेत, शंभुराज देसाई त्यांच्चा मतदारसंघामध्ये आहेत. संजय राठोड यांच्या आईचं निधन झाल्याने तेही येऊ शकले नाहीत. तर कोकणातील युतीबाबत चर्चा करण्यासाठी मी रवींद्र चव्हाण यांच्या घरी गेलो होतो, मात्र चव्हाण घऱी नसल्याने ही भेट होऊ शकली नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.