सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता, ‘लोकमत’च्या वृत्ताची आयोगाकडून दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:19 IST2026-02-03T16:18:13+5:302026-02-03T16:19:28+5:30

राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा

Exemption of CTET teachers from election work Commission takes note of Lokmat report | सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता, ‘लोकमत’च्या वृत्ताची आयोगाकडून दखल 

संग्रहित छाया

सांगली : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच शिक्षकांसाठी बंधनकारक असलेली सीटीईटीची परीक्षा असल्याने सांगली जिल्ह्यातील १ हजार ४८४ शिक्षकांना सोमवारी निवडणूक कामातून वगळण्यात आले. राज्यभरातील परीक्षार्थी शिक्षकांचा आढावा घेत त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अशा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याची सूचना दिली होती.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे. सक्तीची असलेली सीटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीस आहे. ८ फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला होता.

‘लाेकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर आयोगाने दखल घेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आढावा घेत अशा शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी आणि निवडणूक विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सीटीईटी परीक्षा देणारे एक हजार ४८४ शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कामकाजातून वगळले आहे. यामुळे सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची गैरसोय दूर होणार आहे.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती संकलन

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सीटीईटी परीक्षेला बसलेल्या व निवडणूक कामासाठी नियुक्त शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अन्य शिक्षकांनाही निवडणूक कामातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक कामातून वगळलेले तालुकानिहाय शिक्षक

तालुका / मतदान केंद्र संख्या / एकूण नियुक्त कर्मचारी, अधिकारी/ नियुक्त रद्द शिक्षक संख्या
आटपाडी / १५२ / ८२७ / १५८
जत / २९२ / १६२० / ३३५
खानापूर / १३० / ७१९ / १४७
कडेगाव / १४८ / ६८० / १३४
तासगाव / २०१ / ९६६ / १०७
क.महांकाळ / १३० / ६९० / ११८
पलूस / १२९ / ६०० / ६१
वाळवा / ३६० / १७७६ / १९२
शिराळा / १७१ / ७६० / ९५
मिरज / ३२६ / १५७१ / १३७
एकूण २०३९ / १०२०९ / १४८४

शिक्षकांना निवडणूक कामातून वगळल्यामुळे कडेगाव तालुक्यात १०६, तासगाव २५, पलूस २८ आणि शिराळा तालुक्यात ९५ कर्मचारी कमी पडले आहेत. या ठिकाणी मिरज तालुक्यातील उपलब्ध शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावली आहे. आटपाडी तालुक्यात जत तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी सांगली

Web Title : लोकमत रिपोर्ट के बाद सीटीईटी शिक्षकों को चुनाव ड्यूटी से छूट

Web Summary : सीटीईटी टकराव के कारण सांगली ने 1,484 शिक्षकों को चुनाव ड्यूटी से मुक्त किया। लोकमत की रिपोर्ट के बाद, चुनाव आयोग ने परीक्षा देने वाले शिक्षकों को छूट देने का निर्देश दिया। जिला कलेक्टर अधिक शिक्षकों को राहत देने के लिए डेटा संकलित कर रहे हैं।

Web Title : CTET Teachers Excused from Election Duty After Lokmat Report

Web Summary : Sangli excused 1,484 teachers from election duty due to CTET clash. Following a Lokmat report, the Election Commission directed districts to exempt teachers taking the exam. District collectors are compiling data to relieve more teachers.