Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 11:48 IST2020-09-20T06:49:57+5:302020-09-20T11:48:51+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट, लोकमत ऑनलाइनच्या कार्यक्रमात विशेष मुलाखत

Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाºयांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत आॅनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले. ही संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यूट्युबवर’ आहे. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाºयांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहºयावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाºयांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाºयाचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.
पवार यांनी एका महिला अधिकाºयाचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगत अन्य चार अधिकाºयांची नावेही सांगितली होती, असेही एका नेत्याने स्पष्ट केले. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला. नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये त्यातील काही अधिकाºयांना बाजूला सारले गेले. तर काही अधिकाºयांना आजही महत्त्वाची पदे दिली आहेत. वास्तविक अशा अधिकाºयांना पूर्णपणे बाजूला ठेवायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.
कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाºयांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी संमतीपत्र दिले. त्यामुळे सरकार अडचणीत आले. त्यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याचे समर्थन कसे कराल, असे विचारले असता गृहमंत्री म्हणाले, गुप्ता यांच्या हातून त्या काळात शंभर टक्के चूक झाली. ती मोठी चूक होती. त्यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुलीदेखील दिली. पण त्यांची आजपर्यंतची कारकिर्द चांगली राहिली आहे. म्हणूनच त्यांना आता पुण्याची जबाबदारी देण्यात दिली.
छोट्या - छोट्या कारणांसाठी राज्यपालांकडे जाण्याचे काम विरोधी पक्षाकडून होत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. पण त्यांनी आता राजभवनावर एक रूम घेऊन राहावे. म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविषयी ते म्हणाले, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणून संबोधायचे, अशा गोष्टी करणाºयांचे मी नावही घेऊ इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना भाजप खतपाणी घालत आहे.
संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यूट्युब’वर
पार्थ पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, असे पत्र जेव्हा पहिल्यांदा दिले त्या वेळी आपली प्रतिक्रिया काय होती? इथपासून ते पोलीस भरतीत मराठा आरक्षण, कोरेगाव-भीमा चौकशी समितीला मुदतवाढ, एल्गारच्या चौकशीसाठी वेगळी एसआयटी, पोलीस दलाचे आधुनिकीकरण अशा अनेक विषयांवर गृहमंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत. ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी 10.30 वाजता ‘लोकमत यूट्युब’वर पाहता येईल. तसेच ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी 10 वाजता खालील फेसबुक लिंकवर पाहता येईल.
मग नेत्यांचा काय उपयोग? - खा. संजय राऊत
गृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाºयांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील.