चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात रंगलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एंट्री झाली आहे. संघाच्या मते देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे. संघात ही बाब आधीपासून स्पष्ट आहे, असे स्पष्ट मत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.
देशात वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तेथील आपापली मातृभाषा बोलतात. त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे, असा आग्रह असतो. मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट खूप आधीपासून ठरलेली आहे, असेही आंबेकर यांनी सांगितले. संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील प्रचारकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती देताना आंबेकर यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, शताब्दी वर्षाचा उत्सव आणि देशाच्या विविध प्रांतांतील परिस्थिती अशा तीन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले. मैतेई आणि अन्य समुदायाशी चर्चा करून संघ मणिपूरमध्ये शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही आंबेकर यांनी स्पष्ट केले.
समाजातील विविध घटक आणि विचारांच्या लोकांना संघाशी जोडण्याकरिता कार्यक्रम राबविणार जाणार आहेत. शताब्दी वर्षांत ५८,४०९ मंडळ आणि ११,३६० खंड / वस्त्यांमध्ये ‘हिंदू संमेलन’ आयोजित करणार. संघाच्या विभागणीनुसार देशात सर्व जिल्ह्यांमध्ये ‘घर-घर संपर्क’ मोहीम राबविणार.केवळ आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती पुरेशी नाही. यासाठी पंच परिवर्तन व्हायला हवे. यात पर्यावरण, कौटुंबिक जीवनमूल्ये, सामाजिक सद्भाव आदींचा समावेश असावा. वर्षभरात ४० पेक्षा कमी आणि ४० ते ६० वयोगटांसाठी आयोजित वर्गात एकूण २१,८७९ स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले. मागील ११ वर्षांत स्वयंसेवकांची संख्या वाढली.