अनुसूचित जाती-जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदाच घर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:23 IST2025-06-11T09:22:59+5:302025-06-11T09:23:15+5:30

Devendra Fadnavis: ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातीमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

Every family belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes will be given a house this year, assures Chief Minister Devendra Fadnavis | अनुसूचित जाती-जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदाच घर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार वितरण

अनुसूचित जाती-जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदाच घर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार वितरण

मुंबई -  ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातीमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,  रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. त्यात मानवता, समता, बंधुता आणि संधीची समानता आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘घरोघरी संविधान’ हा उपक्रम राज्यात राबवण्यात येत असून, त्यातून उद्देशिका प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात आहे.

सेवांचा लाभ आता व्हॉट्सॲपद्वारे 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक अंतिम टप्प्यात असून  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची स्मारके उभारण्याची कामेही वेगाने सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या पुरस्कारांसाठी राज्यभरातून ८०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १३० जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश आहे. विभागाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सॲपद्वारे घेता येणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सन २०२३-२४ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

Web Title: Every family belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes will be given a house this year, assures Chief Minister Devendra Fadnavis