Manoj Jarange patil Devendra Fadnavis: "ते प्रत्येकवेळी माझ्या समाजाचा आणि माझा अपमान करतात. जाणूनबुजून करतात. कारण मी मॅनेज होत नाही. फडणवीस साहेब, पण मी हटत नाही. तुम्ही गोळ्या जरी घातल्या, तरी मनोज जरांगे झेलणार आहे. पण, आता मागे हटत नाही", असा इशारा मनोज जरांगे यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी सरकारला दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "मी पुन्हा पुन्हा सांगतो की, बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर तुमचं राजकीय करिअर बरबाद करणारी असेल."
जरांगे म्हणाले, तुमचा उपकार मराठे मरेपर्यंत विसरणार नाही
"मी कालही सांगितलं, आजही पवित्र भूमितून विनंती करून सांगतो की, फडणवीसजी, तुम्हाला ही योग्य संधी आहे; संधीचं सोनं करायची. गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठे तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा मरेपर्यंत उपकार विसरणार नाहीत", अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मांडली.
"तु्म्ही काही आमचे वैरी नाहीत. तुम्ही काही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची मराठाविरोधी आडमुठी भूमिका सोडून द्या. मोकळ्या मनाने वागायला सुरूवात करा. आम्ही फक्त आरक्षणासाठी तुमच्याशी भांडतोय. तेही लोकशाही मार्गाने. आम्ही दिलेला शब्द कधीही बदलणार नाही. तुम्हाला संधी आली आहे, तिचं सोनं करा", असे मनोज जरांगे म्हणाले.
"...मग एका दिवसात मागण्या मान्य करा"
एका दिवसाच्या परवानगीबद्दल बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "अस होऊच शकत नाही. मग एका दिवसात अंमलबजावणी करा. आताच करा. इथूनच आम्ही ट्रक भरतो शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं. एका दिवसाचं उपोषण कसं करायचं? मग तुम्ही एका दिवसात मागण्या मान्य करा."