‘वाहन घसरले तरी तो अपघातच; महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई द्या’; उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:24 IST2025-08-19T14:22:34+5:302025-08-19T14:24:02+5:30
मोटार वाहन कायद्यात अपघाताची व्याख्या परिभाषित केलेली नाही.

‘वाहन घसरले तरी तो अपघातच; महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई द्या’; उच्च न्यायालयाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुसऱ्या वाहनाची धडक लागल्यावरच अपघात ठरत नाही, तर वाहन घसरल्यासही तो अपघात ठरतो. त्यामुळे अशा अपघातातील पीडितही मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसानभरपाईस पात्र आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने मृत महिलेच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देताना नोंदविले.
मोटार वाहन कायद्यात अपघाताची व्याख्या परिभाषित केलेली नाही. व्यक्तीला अचानक इजा पोहोचवणारी घटना, असा उल्लेख करण्यात आला आहे, असे म्हणत न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने एका महिलेच्या नातेवाईकांना ७ लाख ८२ हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. संबंधित महिलेची साडी मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने मोटारसायकल रस्त्यावर घसरली आणि त्या अपघातात तिचा मृत्यू झाला.
नुकसानभरपाईसाठी महिलेच्या पतीने मोटार वाहन अपघात लवादात अर्ज केला. मात्र, लवादाने त्यांची मागणी फेटाळली. अर्जानुसार, पती, पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुले दुचाकीवरून प्रवास करत होती. ऐनवेळी पत्नीची साडी मोटारसायकलच्या पाठच्या चाकात अडकली आणि मोटारसायकल घसरली. यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला मृत घोषित करण्यात आले हाेते.